पुणे: उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र आहे. त्यामुळे उत्तरेतून शीतलहरी वेगाने राज्यात येत आहेत. मात्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात बाष्पयुक्त वारे येत आहेत.
त्यामुळे थंडीत किंचित घट होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, मंगळवारी (दि.१७) अहिल्यानगर ५.६, तर पुणे शहरातील एनडीए भागाचा पारा ६.५ अंशांवर खाली आला होता.
जम्मू-काश्मीरपासून मध्य प्रदेशपर्यंतच्या भागात थंडीची लाट तीव्र आहे. या सर्व भागांत कडाक्याच्या थंडीचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या भागांत पारा ० ते ६ अंशांवर आहे तर काश्मीरमध्ये उणे ५ इतके तापमान खाली गेले आहे.
त्या भागातून शीतलहरी महाराष्ट्रात येत आहेत. मात्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे त्या भागातून राज्यात बाष्पयुक्त वारे येत आहे.
या दोन्हींची टक्कर महाराष्ट्रात होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यात १८ ते २१ डिसेंबरदरम्यान थंडीत किंचित घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
नाशिक ८.०, तर निफाड ५.७ अंशांवर- नाशिक शहरात मंगळवारी सकाळी ८.० अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविले गेले. तसेच जिल्ह्यात निफाडमध्ये पारा ५.७ अंशापर्यंत घसरला, यामुळे गोदाकाठी थंडीचा मुक्काम कायम आहे.- डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गायब झालेल्या थंडीने जोरदार पुनरागमन केले आहे.- आठवडाभरापासून पारा वेगाने घसरण्यास सुरुवात झाली आहे. एका दिवसात चार ते पाच अंशांनी किमान तापमानात घट होऊ लागल्याने थंडीची तीव्रता वाढली आहे.
किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)अहिल्यानगर ५.६पुणे एनडीए ६.५पुणे शिवाजीनगर ८नांदेड ७.६नाशिक ८जळगाव ८.४वर्धा ९.५गोंदिया ८.२नागपूर ८.२धाराशिव १०.२छ. संभाजीनगर १०परभणी ९.४अकोला १०.५सांगली ११.८सातारा ९.१सोलापूर १२.९अमरावती ११.४बुलढाणा ११.६ब्रह्मपुरी ९.६वाशिम १३.६महाबळेश्वर १३.७कोल्हापूर १४.६मुंबई २०