राज्यात सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारी ढगाळ वातावरण कायम राहिल्याने मुंबईसह अनेक ठिकाणी जीवाची काहिली झाली.
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
पुढील तीन दिवसांत महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार कोसळणार, दोन दिवस प्रभाव असणार आहे.
त्यामध्ये कोकण किनारपट्टी परिसरात विजांच्या कडकडाटासह तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कुठे कोणता अलर्ट?- पुणे, सातारा, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि गोंदिया या जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' तर उर्वरित तीस जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.- मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नगर, जळगाव, सातारा, जालना, छत्रपती संभाजीनगर येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची किंवा काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.- मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी बुधवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नंतर तो यलो अलर्ट असेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
कशामुळे होतोय पाऊस? हिमालय ते उत्तर भारतात पश्चिमी चक्रीय वात सक्रिय झाली आहे. तामिळनाडू राज्यातही कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे देशातील बहुतांश भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. यात हिमालयापासून पूर्वोत्तर भाग, मध्य भारत, मध्य महाराष्ट्र ते दक्षिण भारत असा संपूर्ण देशात अवकाळी पावसाचा प्रभाव हा दि. ४ एप्रिलपर्यंत राहणार आहे.
अधिक वाचा: ढग म्हणजे नेमके काय? आणि ते हवेमध्ये कसे तरंगतात? वाचा सविस्तर