कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील हजारो नागरिकांच्या शेत जमिनी, घरे बुडवणाऱ्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला केंद्र सरकारने परवानगी देऊ नये, ही उंची वाढवण्यास महाराष्ट्राचा ठाम विरोध असेल, अशी स्पष्ट भूमिका खासदार धनंजय महाडिक व खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांच्यासमोर गुरुवारी दिल्लीत मांडली.
याबाबतचे निवेदनही दोघांनी मंत्री पाटील यांना दिले. यावर मंत्री पाटील यांनी हा विषय न्यायालयात आहे. मात्र, महाराष्ट्रासह आंध्र व तेलंगणाचाही उंची वाढवण्याला विरोध असेल तर याप्रश्नी मध्यस्ती करून लवकरच चारही राज्यांच्या जलसंपदा मंत्र्यांसमवेत बैठक घेण्याची ग्वाही दिली. अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीवरून महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली असून या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांची खासदार महाडिक व खासदार माने यांनी भेट घेतली.
खासदार महाडिक म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात महापुराचे संकट अतिगंभीर होऊ शकते. महाराष्ट्रासह आंध्र आणि तेलंगणा राज्याचाही अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध आहे. हजारो नागरिकांच्या शेतजमिनी, घरे बुडवणाऱ्या या धरणाची उंची वाढवण्याला केंद्र सरकारने परवानगी देऊ नये. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी एक बैठक बोलवावी, अशी मागणी महाडिक यांनी केली.
संयुक्त पूर नियंत्रण प्राधिकरण स्थापन करा
अलमट्टी धरणाची पावसाळ्यात पाण्याची पातळी कमाल मर्यादा ५१५ मीटर निश्चित करावी, दोन्ही राज्यांमध्ये वैज्ञानिक समन्वयासाठी संयुक्त पूर नियंत्रण प्राधिकरण स्थापन करून कृष्णा नदीच्या खोऱ्यात रिअल-टाइम मॉनिटरिंग सिस्टम कार्यान्वित करा, धरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निष्काळजीपणा आणि सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीररीत्या जबाबदार धरा, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली.
हेही वाचा : पडीक जमिनीवर औषधी वृक्षांची लागवड करून शेतीला लावा आर्थिक हातभार सोबत अनुदानही मिळणार