Maharashtra Weather Update : परवा शनिवार दि. ८ नोव्हेंबर (चतुर्थी) पासुन दुपारी ३ चे कमाल व पहाटेचे ५ चे किमान अशा दोन्हीही तापमानात महाराष्ट्रात हळूहळू २ ते ३ डिग्रीने घसरण होवून संपूर्ण महाराष्ट्रात थंडीला सुरवात होण्याची शक्यता जाणवते. मंगळवार दि. ११ नोव्हेंबर पासुन तर पहाटेचे ५ चे किमान तापमानात ३ ते ४ डिग्रीने घसरण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
सध्याचे तापमान कसे आहेत?
सध्या महाराष्ट्रात भागपरत्वे कमाल तापमान २८ ते ३२ डिग्री तर किमान तापमान १८ ते २० डिग्री दरम्यान जाणवत आहे. मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरीच्या २ डिग्रीने कमी तर किमान तापमान सरासरीच्या २ डिग्रीने अधिक आहे. मुंबईसह कोकणात मात्र दुपारचे कमाल तापमान ३१ डिग्रीच्या आसपास असुन सरासरीच्या २ ते डिग्रीने तर पहाटेचे ५ चे किमान तापमान हे २१ ते २३ डिग्री दरम्यान असुन सरासरीच्या २ डिग्रीने खालावलेले आहे.
तापमान घसरण शक्यता कशामुळे?
सध्या उत्तर भारतात बळकट पश्चिमी झंजावातातून हंगामाला साजेशी बर्फ वृष्टी होत आहे. महाराष्ट्रात येत्या दोन दिवसानंतर आकाश निरभ्र जाणवेल. महाराष्ट्र सहित संपूर्ण वायव्य भारतात हवेच्या दाबात २ ते ४ हेक्टापास्कलने वाढ होवून १०१४ हेक्टापास्कल अशा एकसमान व एकजिनसी हवेच्या दाबाची शक्यता जाणवते. हवेच्या घनतेत वाढ जाणवेल.
समुद्रसपाटी पासुन दिड किमी उंचीपर्यंत उत्तरभारतातून महाराष्ट्र सीमेपर्यंत ताशी १० किमी. येणारे उत्तरी थंड वारे महाराष्ट्रात त्यांची दिशा पूर्वीय जाणवेल. येणाऱ्या थंड वाऱ्यांना सध्या कोणताही अटकाव जाणवणार नाही. शिवाय आकाश निरभ्र जाणवेल. यातून महाराष्ट्रात थंडीची शक्यता जाणवते.
पावसाच्या शक्यतेबद्दल काय?
आज व उद्या विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात फक्त ढगाळ वातावरणाची शक्यता जाणवते. विदर्भात आकाश निरभ्र जाणवेल. पावसाची शक्यता जाणवत नाही.
- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.
