Cold Weather : आज शुक्रवार दि. २ जानेवारी (पौष पौर्णिमा) ते मंगळवार दि.६ जानेवारी (अंगारकी चतुर्थी) पर्यंतच्या ५ दिवसात विदर्भ, मराठवाडा व धुळे, जळगांव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे (पश्चिम) जिल्ह्यांत सध्यापेक्षा किमान तापमानात काहीशी वाढ होवून थंडी काहीशी कमी होण्याची शक्यता जाणवते. तेथील पहाटेचे किमान तापमान १० ते १३ अंश से. दरम्यान जाणवेल.
त्यानंतरही एक-दोन दिवस म्हणजे गुरुवार दि. ८ जानेवारी पर्यन्तही थंडीचे प्रमाण तसेच काहीसे कमीच राहू शकते. विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली (उत्तर) व नाशिक (पूर्व) जिल्ह्यात मात्र किमान तापमान १२ ते १४ अंश से दरम्यान राहील
नंदुरबार, नाशिक, पुणे जिल्ह्याचा घाटमाथा, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व धाराशिव जिल्ह्यांत किमान तापमान १२ ते १६ अंश से दरम्यान राहील. मुंबईसह संपूर्ण कोकणात मात्र पहाटेचे किमान तापमान १८ ते २० अंश से दरम्यान जाणवेल.
उत्तर भारतात, कमकुवत प्रत्यावर्ती चक्रीय वारा प्रणालीतून (घड्याळ काटा दिशेने) वाहणाऱ्या वाऱ्यामुळे, महाराष्ट्राकडे थंडी घेऊन येणारे थंड कोरडे पूर्वीय वारे पूर्णतः ठप्प झाले आहेत. त्यामुळे नववर्षाच्या या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात काहीशी थंडी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शुक्रवार दि. ९ जानेवारीपासून उत्तर भारतातील ह्या प्रणालीचा प्रभाव कमी होवून महाराष्ट्राकडे झेपावणारे थंड कोरडे पूर्वीय वारे पूर्ववत होण्याच्या शक्यतेतुन पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता जाणवते.
दक्षिण भारतातील कर्नाटक आंध्र केरळ ता. नाडू अश्या ४ राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर ह्या ३ महिन्यात कार्यरत असणारा ईशान्य (हिवाळी) मान्सून बळकट प्रणाली अभावी सध्या त्याची तीव्रताही कमी होत असुन लवकरच एकूणच ईशान्य मान्सून देशातून निर्गमनाची तयारी करत आहे, असे वाटते. त्यामुळे जानेवारी- फेब्रुवारीच्या महाराष्ट्रातील पुढील थंडीलाही ही स्थितीही अनुकूल ठरू शकते.
- माणिकराव खुळे
Meteorologist(Retd )
IMD Pune.
