श्रीमंत माने
नागपूर:विदर्भाच्या कोरडवाहू शेतीचा शाप पुसण्यासाठी आणि हजारो शेतकरी आत्महत्यांचा डाग पुसण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय इच्छाशक्तीतून आकाराला येत असलेला 'वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प' हे आता केवळ दिवास्वप्न राहिलेले नाही.(Wainganga-Nalganga River Link Project)
प्रशासकीय मान्यता आणि केंद्रीय जलआयोगाकडे मंजुरीसाठी दाखल झालेला हा प्रस्ताव, पूर्ण झाल्यानंतर देशातील जलअभियांत्रिकीचा एक अद्भूत चमत्कार (Engineering Marvel) ठरेल. तेरा बोगदे, सात लिफ्ट, अजस्र पंप आणि धडकी भरविणारा पाण्याचा वेग, हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य असेल.(Wainganga-Nalganga River Link Project)
पावसाळ्यातील ७० दिवसांत ६३.७३ टीएमसी पाणी उचलणार
हा प्रकल्प भारतातील पाटबंधारे विकासात मैलाचा दगड ठरणार आहे. पावसाळ्यात केवळ सत्तर दिवसांच्या कालावधीत गोसेखुर्दच्या इंदिरासागर जलाशयातून ६३.७३ टीएमसी पाणी उचलण्याचे उद्दिष्ट आहे.
हे पाणी शेती, उद्योग आणि पिण्यासाठी वर्षभर उपलब्ध व्हावे यासाठी अंदाजे १०० मीटर रुंद आणि ३८८ किलोमीटर लांब मुख्य कालवा तयार केला जाईल. या कालव्याला जोडून ५० धरणांमध्ये पाणी साठवण्याची व्यवस्था असेल.
३२ उपसा योजना आणि आठ जिल्ह्यांच्या ३८ तालुक्यांमधील उपकालवे, पाटसऱ्यांची बंद जलवाहिन्यांची वितरण व्यवस्था, हे चित्र काही वर्षांनंतर जलअभियांत्रिकीचा चमत्कार प्रत्यक्षात आणेल.
बोगद्यांतून जलप्रवाह आणि प्रचंड क्षमतेचे सर्पिलाकार पंप
या प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात १३ बोगदे असतील, ज्यांची एकूण लांबी २० किलोमीटरपेक्षा जास्त असेल.
विशेषतः गोसेखुर्द ते लोअर वर्धा आणि काटेपूर्णा ते नळगंगा या पहिल्या आणि तिसऱ्या लिंकमधील जलप्रवाह प्रत्येकी १ किलोमीटरपेक्षा जास्त लांब बोगद्यातून जाईल.
प्रकल्पाच्या प्रारंभबिंदूपासून शेवटापर्यंत एकूण उचल उंची २०० मीटर आहे, यासाठी सात ठिकाणी पाणी उपसा केले जाईल. या उपसा योजनांसाठी तब्बल ९ लाख ८५ हजार अश्वशक्तीचे पंप बसविण्यात येतील.
राज्यात पहिल्यांदाच या प्रकल्पासाठी व्हॉल्युट म्हणजे सर्पिलाकार पंप वापरले जाणार आहेत, ज्यांची प्रत्येक पंपाची क्षमता साडेबारा हजार अश्वशक्ती असेल. आतापर्यंत राज्यात कमाल १८०० अश्वशक्तीचे पंप वापरले आहेत, त्यापेक्षा आठपट जास्त क्षमतेचे पंप या प्रकल्पात असतील.
कालव्यावर सौरऊर्जा निर्मितीचा विचार
या प्रकल्पाच्या अद्भूत रचनेत आणखी एक विलोभनीय भर पडण्याची शक्यता आहे. मुख्य कालव्यावर सौरऊर्जा निर्मितीबाबत विचार सुरू आहे. जर हे प्रत्यक्षात आले, तर सौरऊर्जे निर्मितीमुळे प्रकल्पाची कार्यक्षमता आणि पर्यावरणपूरकता अधिकच वाढेल.
कालव्याचे पाणी तब्बल ११ हजार ३६३ क्युसेक वेगाने वाहणार आहे, जे सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक वेग असलेल्या उजनी कालव्याच्या पाण्याचा वेग (सेकंदाला ३ हजार ८०० घनफूट) जवळपास चौपट जास्त असेल.
'केन-बेतवा'च्या तुलनेत दुप्पट मोठा प्रकल्प
देशातील प्रमुख नदीजोड प्रकल्पांमध्ये 'वैनगंगा-नळगंगा नदीजोड' समाविष्ट आहे. केन-बेतवा प्रकल्पाच्या तुलनेत हा प्रकल्प कालव्याची लांबी आणि खर्चाचा विचार करता दुपटीहून अधिक मोठा आहे.
केन-बेतवा प्रकल्पाची लांबी २२१ कि.मी. आहे, तर वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाची लांबी ३८८ कि.मी. असेल. या प्रकल्पाचे सिंचनक्षेत्र केन-बेतवा योजनेपेक्षा (१० लाख ६२ हजार हेक्टर) कमी असले तरी, विदर्भाच्या सिंचन व्यवस्थेसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
विदर्भाची जलक्रांती आणि शेतकऱ्यांचे भवितव्य
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प केवळ अभियांत्रिकीचा अद्भूत चमत्कारच नाही, तर विदर्भाच्या जलक्रांतीचा पाया रचणारा प्रकल्प आहे.
या प्रकल्पामुळे विदर्भातील कोरडवाहू शेतीला पाण्याचे शाश्वत साधन मिळेल, शेतकऱ्यांचे भवितव्य उजळेल आणि शेतकरी आत्महत्यांसारख्या गंभीर प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिद्दीमुळे आणि राजकीय इच्छाशक्तीमुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यास लवकरच सुरुवात होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Web Summary : The Wainganga-Nalganga river link project, driven by Devendra Fadnavis, aims to end Vidarbha's water woes. It will lift 63.73 TMC of water in 70 days, creating a 388 km canal with 13 tunnels and seven lifts. This project promises water for irrigation, industry and drinking, transforming Vidarbha's agricultural landscape.
Web Summary : देवेंद्र फडणवीस द्वारा संचालित वैनगंगा-नलगंगा नदी जोड़ परियोजना का लक्ष्य विदर्भ की पानी की समस्याओं को समाप्त करना है। यह 70 दिनों में 63.73 टीएमसी पानी उठाएगा, जिसमें 13 सुरंगों और सात लिफ्टों के साथ 388 किलोमीटर लंबी नहर बनेगी। यह परियोजना सिंचाई, उद्योग और पेयजल के लिए पानी का वादा करती है, जिससे विदर्भ का कृषि परिदृश्य बदल जाएगा।