राजरत्न सिरसाट
दक्षिण-पश्चिम मान्सूनने अखेर पश्चिम विदर्भातून परतीचा प्रवास सुरू केला आहे. अकोला जिल्ह्याच्या सुमारे ६० टक्के भागातून तसेच बुलढाण्याच्या काही भागातून मान्सून माघारी गेल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. (Vidarbha Monsoon Update)
विदर्भातील इतर भागातही हवामान मान्सून परतीसाठी अनुकूल असून, पुढील दोन ते तीन दिवसांत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Vidarbha Monsoon Update)
मान्सून माघारीची नोंद
१० ऑक्टोबर २०२५ रोजी अकोला, अहिल्यानगर, जबलपूर आणि अलिबाग या भागांतून मान्सूनची माघार झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
सध्या माघारीची रेषा २८° उत्तर ८६° पूर्व रक्सौलपासून १८.५° उत्तर ७२° पूर्व अलिबागपर्यंत पसरलेली आहे. गेल्या २४ तासांत विदर्भातील काही भागांत तुरळक ठिकाणी पाऊस झाला. गोंदिया येथे ५.९ मिमी, तर यवतमाळच्या बाभूळगाव येथे ०.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तापमानात झपाट्याने वाढ
मान्सून माघारीनंतर राज्यात उष्णतेची लाट पुन्हा जाणवू लागली आहे. अनेक शहरांमध्ये तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, ‘ऑक्टोबर हीट’चा चटका स्पष्ट जाणवतोय. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात उष्णतेचा कहर कायम राहील, असा अंदाज वर्तविला आहे.
पावसाचा हंगाम समाधानकारक
या वर्षी अकोला जिल्ह्यात मान्सून काळात चांगला पाऊस झाला. १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान एकूण ७३४.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक २५८.५ मिमी पाऊस पडल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. शहरासह जिल्ह्याला पावसाने जोरदार तडाखा दिला असून, अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले.
धरणांतून विसर्ग, शेतकऱ्यांना दिलासा
यावर्षी अकोला जिल्ह्यातील सर्वच मध्यम व मोठ्या धरणांतून सप्टेंबर अखेरपर्यंत पाण्याचा विसर्ग सुरू होता. या पावसामुळे धरणांतील पाणीसाठा समाधानकारक आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाण्याची चिंता कमी झाली आहे.
परतीच्या पावसाची प्रतीक्षा
पश्चिम विदर्भातील शेतकरी आणि नागरिक परतीच्या पावसाची वाट पाहत होते. हवामानशास्त्र विभागाने अकोला जिल्ह्यातून मान्सून माघारीची घोषणा केल्याने आता नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
अकोला जिल्ह्याच्या सुमारे ६० टक्के भागातून, तर बुलढाणा जिल्ह्याच्या काही भागातून मान्सून परतला आहे. विदर्भातही परतीसाठी हवामान अनुकूल असून, येत्या दोन ते तीन दिवसांत संपूर्ण भागातून मान्सून माघारीची शक्यता आहे.- डॉ. प्रवीण कुमार, हवामानशास्त्रज्ञ, भारतीय हवामानशास्त्र विभाग