Siddheshwar Dam Water : हिंगोली, नांदेड आणि परभणी या तीन जिल्ह्यांतील रब्बी पीक लागवडीसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या सिद्धेश्वर धरणातून यंदाच्या हंगामासाठी चार आवर्तनांचे (चार पाणीपाळ्यांचे) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. (Siddheshwar Dam Water)
यामुळे एकट्या हिंगोली जिल्ह्यातील २२,६५८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, तीनही जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची रब्बीसाठीची पाण्याची चिंता दूर झाली आहे. २५ नोव्हेंबरपासून पाणीपाळीला सुरुवात होणार असल्याने रब्बी पिकांची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे. (Siddheshwar Dam Water)
धरणसाठा समाधानकारक
औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण तसेच येलदरी धरण हे या विभागाचे प्रमुख पिण्याचे आणि सिंचनाचे स्रोत आहेत. यंदा दोन्ही जलाशयांमध्ये शंभर टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध असल्यामुळे रब्बी पिकांसाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध राहणार आहे.
सरकारकडून रब्बी हंगामासाठी नोव्हेंबरच्या सुरुवातीला आवर्तन सुरू होण्याची अपेक्षा होती; मात्र नादुरुस्त कालव्यांच्या डागडुजीची कामे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहितेचा अडथळा, यामुळे कालवा सल्लागार समितीची बैठक उशिराने घेण्यात आली आणि आवर्तन जाहीर होण्यास तब्बल 20 दिवसांचा विलंब झाला.
२५ नोव्हेंबरपासून पाण्याचे पहिलं आवर्तन
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबरपासून पहिल्या पाणीपाळीस सुरुवात, तर चारही आवर्तने २ मार्चपर्यंत टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहेत.
कोणत्या जिल्ह्यात किती क्षेत्र येणार सिंचनाखाली?
सिद्धेश्वर धरणाच्या मुख्य कालव्यातून व त्याच्या विविध शाखांद्वारे तिन्ही जिल्ह्यांतील एकूण ५८ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
| जिल्हा | सिंचनाखाली येणारे क्षेत्र (हेक्टर) |
|---|---|
| हिंगोली | २२,६५८ |
| परभणी | १६,१४२ |
| नांदेड | १९,१८८ |
प्रत्येक आवर्तन कालावधी : २४ दिवस
कालव्यांचे प्रकार : मुख्य कालवा, हट्टा, पूर्णा, वसमत, लिंबगाव, मालेगाव आदी शाखा
लाभक्षेत्रातील २५ ते ३० हजार शेतकऱ्यांना दिलासा
सिंचनावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या हजारो शेतकऱ्यांसाठी ही चार आवर्तने दिलासादायक ठरणार आहेत. आचारसंहितेमुळे पाणी आरक्षणावर निर्णय घेण्यात विलंब झाला असला तरी प्रशासकीय पातळीवर मंजुरी मिळाल्याने रब्बी पिकांची पेरणी, गहू, हरभरा, ज्वारी, भाजीपाला आणि इतर नगदी पिकांचे नियोजन आता शेतकरी निर्धास्तपणे करू शकणार आहेत.
पाणी मिळाल्याने पीक वाचणार
आवर्तन उशिरा जाहीर झाले, पण चार पाणीपाळ्या मिळाल्यामुळे रब्बीचे पीक निश्चित वाचेल. पाण्याचा ताण राहणार नाही. असे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सांगितले.
