जळगाव : जिल्ह्याच्या शेती सिंचनासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जलसंपदा विभागाकडून या प्रकल्पाच्या १४०७.२० कोटी रुपयांच्या तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेवर २४ मार्च रोजी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या निर्णयामुळे वर्षानुवर्षे रेंगाळलेल्या या प्रकल्पाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.
तापी नदीवर उभारण्यात येणारा हा बॅरेज प्रकल्प यावल तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यातील ११ गावांमधील १२२८ हेक्टर क्षेत्रासह एकूण ९ हजार १२८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर पाणी उपलब्ध होऊन कृषी उत्पादनात मोठी वाढ होणार आहे.
शेळगाव बॅरेजचा लाभ खर्च गुणोत्तर १.९१ असून, अंतर्गत परतावा दर १०.७२ टक्के इतका आहे. तांत्रिक आणि आर्थिक निकषांवर हा प्रकल्प अत्यंत सक्षम मानला जात आहे. बॅरेजचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले असून, बुडीत क्षेत्रातील ४ पैकी २ पुलांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित २ पुलांची कामे सुरू आहेत.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि सद्य:स्थिती
एकूण साठवण क्षमता : ४.११ टीएमसी
रचना : १८.३० बाय १६.७६ मीटर आकाराचे एकूण १८ दरवाजे.
जमीन संपादन : प्रकल्पासाठी आवश्यक १९६१.४७ हेक्टर जमीन पूर्णपणे संपादित.
सध्याचा पाणीसाठा: सध्या बॅरेजमध्ये २.८९ टीएमसी (७० टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे.
असा वाढत गेला प्रकल्पाचा खर्च
- १९९७ : ९८.१९८ कोटी रुपये (मूळ मान्यता)
- २०११-१२ : ६९९.४८ कोटी रुपये (प्रथम सुधारित मान्यता)
- २०१७-१८ : ९६८.९७ कोटी रुपये (द्वितीय सुधारित मान्यता)
- २०२३-२४ : १४०७.२० कोटी रुपये (तृतीय सुधारित मान्यता)
रॉकेल वाटपासाठी पुरवठा विभागाकडून घरोघरी सर्व्हे, 'ही' अट बंधनकारक, तरच मिळणार रॉकेल
