Join us

Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस पाऊस बरसणार का? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 18:28 IST

Nashik Rain : नाशिक जिल्ह्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Nashik Rain : जुलैच्या पहिल्या आठवड्यात दोन दिवस पावसाने नाशिक (Nashik District) जिल्ह्यात हजेरी लावली. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. जवळपास तीन ते चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने सुरवात केली. दोन दिवस पावसाने (Nashik Rain) जोरदार हजेरी लावली. मात्र पुन्हा पावसाने उघडीप दिली असून शेतकरी (Farmers) चिंतेत आहेत. भात लावणी खोळंबली आहे. आता पुढील पाच दिवस जिल्ह्यात पाऊस कसा असेल, हे पाहुयात.... 

पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता दि. १७ ते २१ जुलै २०२४ दरम्यान मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच हवामान दमट राहण्याची शक्यता राहील. आकाश पुढील पाच दिवस ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान २८-३० डिग्री सें. व किमान तापमान २४-२६ डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच वा-याचा वेग १४-२७ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. यात दि. १६ जुलै २०२४ रोजी नाशिक जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाउस होण्याची दाट शक्यता मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे. 

सामान्य सल्ला

ज्या ठिकाणी पिकाची उगवण झाली नाही त्याठिकाणी नांग्या भरणे किंवा अंतर मशागतीचे कामे करावे. ढगाळ हवामानामुळे भाजीपाला पिकांवर भुरी या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे ८०% गंधक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे मात्र काकडी वर्गीय पिकांमध्ये गंधकाऐवजी हेक्झाकोनॅझोल १० मिली किंवा डायफेन कोनॅझोल ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारावे.

पूर्वेकडील अवर्षण प्रवण व मैदानी विभागात (सिन्नर, चांदवड, मालेगाव, निफाड, नाशिक, येवला व नांदगाव ) पडणा-या पावसाचे पाणी शेतात साठवण्यासाठी उपाय योजना करावी. पावसाचा अंदाज लक्ष्यात घेवुनच खरीप पिकांवरील किटकनाशकाची, बुरशीनाशकाची फवारणीचे कामे करावी. जोरदार पावसाचा अंदाज लक्ष्यात घेता भात रोपवाटिका, नवीन लावलेलि फळबाग व भाजीपाला पिकातून जास्तीचे पाणी काढून टाकावे. वांगी व मिरची पिकाचे सहा आठवडे कालावधीचे रोपे लागवडीसाठी वापरावे. ज्या ठिकाणी लवकर पेरणी झाली असेल त्या ठिकाणी शेत तणमुक्त ठेवावे.

संकलन : विभागीय संशोधन केंद्र आणि ग्रामीण मौसम कृषि सेवा केंद्र इगतपुरी 

टॅग्स :पाऊसहवामाननाशिकमोसमी पाऊसशेती