नाशिक : गिरणा धरणातूनरब्बी हंगामातील यंदाचे पहिले आवर्तन गुरुवारी सकाळी १० वाजता सोडण्यात आले. पांझण डाव्या मुख्य कालव्यातून सकाळी १० वाजता तर दुपारी १२ वाजता जामदा डावा कालवा व उजव्या कालव्यातून पहिले आवर्तन सोडण्यात आले. या पहिल्या आवर्तनामुळे रब्बी पिकांना मोठा फायदा मिळणार आहे.
जळगाव येथील गिरणा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या आदेशान्वये उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळी १० वाजता पांझण डावा मुख्य कालव्याव्दारे पहिले आवर्तन ५० क्यूसेक्सने सोडण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता जामदा डावा कालवा, उजवा कालवा व निम्न गिरणा कालव्यात ८२५ क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले. या आवर्तनामुळे नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.
या आवर्तनामुळे चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भडगाव, एरंडोल यासारख्या भागातील शेतीला पाणी मिळणार आहे. हे पाणी डिसेंबरच्या सुरुवातीला किंवा मध्यात सोडले जाते. पण यंदा धरणात पुरेसा जलसाठा असल्याने सर्व भागातून आवर्तन सोडण्याची मागणी होत होती. १ लाख ४१ मी 1 हजार ३६४ एकर क्षेत्र भिजवण्याची या धरणाची क्षमता आहे. धरणात पुरेसा जलसाठा झाला तर या परिसरातील पाणी चिंता तर मिटतेच, परंतु शेतीलाही मोठा लाभ होतो.
शेतकऱ्यांमध्ये शेतीच्या कामाची लगबग सुरू
रब्बी हंगामाला प्रारंभ झाल्याने पाण्याच्या आवर्तनावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये शेती कामांची लगबग सुरू आहे. हिवाळी पिकांसाठी गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा पेरणी केलेल्या पिकांना सिंचन मिळेल. चाळीसगाव तालुक्यात खरिपात झालेले पिकांचे नुकसान काहीअंशी का होईना; मात्र रब्बीतील उत्पन्नातून भरून निघण्याची आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
भडगावात कालवे, पाटचाऱ्या दुरुस्तीमुळे आवर्तनास विलंब
गिरणा पाटबंधारे विभागाने रब्बी हंगामासाठी जामदा उजवा व डाव्या कालव्यांना पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्याचे नियोजन केले होते. मात्र कालवे व पाटचाऱ्या दुरुस्तीच्या कामामुळे कालव्यांना पाण्याचे आवर्तन सोडण्यास विलंब झाला आहे.
