Wather Rain Update : सध्या पीक काढणीचा काळ असुन पावसासंबंधी भडक बातम्या पसरवून शेतकऱ्यांना घाबरवले जात आहे. प्रत्यक्षात पुढील १०-१२ दिवस म्हणजे शुक्रवार दि. २४ एप्रिलपर्यंत घाबरून जाण्यासारखी अशी स्थिती नाही. असे वाटते. नंतरच्या कालावधीचा खुलासा केला जाईल.
ढगाळ वातावरण व किरकोळ पाऊस -
ठाणे, पालघर, रायगड, पुणे, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, बीड, जालना, परभणी, नांदेड, अकोला, नागपूर, चंद्रपूर अशा १४ जिल्ह्यात सोमवार ते बुधवार दि. २० ते २२ एप्रिल अश्या ३ दिवसा दरम्यान ढगाळ वातावरण राहून अगदीच किरकोळ म्हणजे २ ते ३ मिमी. इतक्या पावसाची शक्यता जाणवते.
उन्हाची ताप व उष्णतेच्या लाटा -
अजूनही पुढील ५ दिवस म्हणजे शुक्रवार दि. १७ एप्रिल (चैत्री आमावस्या) पर्यंत महाराष्ट्रातील दुपारचे कमाल तापमान सरासरीच्या व काही ठिकाणी एखाद्या डिग्रीने वाढीव पातळीत असण्याची शक्यता आहे.
शनिवार दि. १८ एप्रिल (वैशाख मासारंभा) पासुन एप्रिल अखेरपर्यंत मात्र महाराष्ट्रातील दुपारच्या कमाल तापमानात वाढ होवून, मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्हे व मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्रीला लागून असलेल्या पश्चिम भाग व घाटमाथ्यावरील क्षेत्रात सरासरीपेक्षा तापमानात अधिक वाढ जाणवेल. शिवाय मराठवाडा व विदर्भात काही जिल्ह्यांच्या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचीही शक्यता जाणवते.
मान्सून २०२६ चा -
जून ते सप्टेंबर ४ महिन्यात महाराष्ट्रात पाऊस हा सरासरीपेक्षा कमीच राहणार आहे. एल निनो हा ऑगस्ट व सप्टेंबर ह्या २ महिन्यात अवतरण्याची शक्यता आहे. परंतु याच २ महिन्यात आयओडी हा धन असण्याच्या शक्यतेमुळे मान्सूनवर अधिकच अति- विपरित परिणाम न जाणवण्याची शक्यताही आहे. या संबंधी सविस्तर अहवाल येत्या २ दिवसात प्रस्तुत केला जाईल.
- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd )
IMD Pune.
