नाशिक : यंदा पर्जन्यमान अधिक असल्याने जुलैच्या मध्यापासूनच जिल्ह्यातील ९ मध्यम धरणे ओव्हरफ्लो (Nashik Dam Overflow) झाली आहेत. यामध्ये गंगापूर धरणसमूहातील (Gangapur Dam) आळंदी, पालखेड धरणसमूहातील वाघाड, दारणा धरणसमूहातील भावली, वालदेवी आणि भाम, तसेच गिरणा खोरे धरणसमूहातील भोजापूर, हरणबारी आणि केळझर यांचा समावेश आहे.
सध्या धरणसमूहांत ७७ टक्के जलसाठा असून १४ धरणांतून विसर्ग सुरू केला गेला आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीला आतापर्यंत ३६ टीएमसी पाणी रवाना झाले आहे. एकूण १० धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आदल्या श्रावणमासाच्या दिवसापासूनच राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे.
गत तीन दिवसांत जिल्ह्यातील ७ मोठ्या आणि १९ मध्यम धरणप्रकल्पांत जलसाठा वाढू लागला आहे. गंगापूर धरणप्रकल्पांतील कश्यपी धरणात ९४ टक्के, गौतमी गोदावरीत ९४ टक्के, तर आळंदी धरणांत १०० टक्के जलसाठा शिल्लक आहे. अजूनही पाच दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गंगापूर धरणातून विसर्ग तसेच गंगापूर धरण समूहात पाऊस वाढल्याने धरणात पूरपाण्याची आवक वेगाने होत असून, ७३.०४ टक्के इतके धरण भरले आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास गंगापूरमधून ६०३ क्युसेकचा विसर्ग गोदावरीत सोडण्यात आला आहे. जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, बागलाण या तालुक्यांमध्ये पर्जन्यमान वाढले आहे. पुढील तीन दिवसांत जुलैमधील पावसाची जिल्ह्यातील सरासरीची तूट भरून निघणार असल्याची चिन्हे आहेत.