नाशिक : निफाड तालुक्यात (Niphad Temperature) तापमानाचा पारा पुन्हा घसरला असून गुरुवारी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात ६.८ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. तर आज ७. ८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यामुळे कडाक्याच्या थंडीने गोदाकाठ गारठला आहे. मागील महिन्यात दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी ५.६ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची (Temperature) नोंद झाली होती. त्यानंतर तापमानात चढ-उतार होत राहिले.
दि. ७ जानेवारीला ९.३ अंश सेल्सिअस तर ८ जानेवारीला ९ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. मात्र, गुरुवारी २.२ अंश सेल्सिअस इतके तापमान कमी होऊन ६.८ इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने तालुका गारठला आहे. सदर थंडी कांदा आणि गहू पिकाला पोषक असली तरी निफाड तालुक्यात थंडीचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने द्राक्ष बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
नाशिकचेही तापमान घसरले
नाशिककरांना गुरुवारी हुडहुडी भरली. किमान तापमानाचा पारा थेट १० अंशांपर्यंत खाली घसरला. तसेच कमाल तापमानदेखील २७.२ अंश इतके नोंदविले गेले. तर आज किमान तापमानात पुन्हा वाढ होऊन १२. ८ तापमान नोंदविण्यात आले. नववर्षाला प्रारंभ होताच शहरात थंडीचे हळूहळू पुनरागमन होऊ लागले आहे. बुधवारी किमान तापमानाचा पारा १२ अंशांपर्यंत घसरला होता. पुन्हा वातावरणात बदल होऊ लागला असून, थंडीची तीव्रता हळूहळू वाढू लागली आहे.
उद्यापासून थंडीचा प्रभाव होणार कमी
शनिवारनंतर राज्यात काहीसे ढगाळ हवामान जाणवणार आहे. तसेच आर्दतावाढीचीही शक्यता नाकारता येत नाही. बंगालच्या उपसागरातून वारे रहाटगाडगे पद्धतीने महाराष्ट्रात आर्दता घेऊन येणार आहेत. यामुळे थंडीचा प्रभाव कमी होईल, असे हवामान अभ्यासक माणिकराव खुळे म्हणाले.