Join us

Marathwada Rain Update : पावसाचे दमदार पुनरागमन; मराठवाड्यात पिकांना नवसंजीवनी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 10:33 IST

Marathwada Rain Update : मराठवाड्यात अखेर पावसाने दमदार एन्ट्री घेतली आहे. परभणीत ढगफुटीसदृश पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, तर जालना, हिंगोलीत पूरस्थिती निर्माण झाली. दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या या पावसाने माना टाकलेल्या पिकांना नवजीवन दिलं असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं आहे.

Marathwada Rain Update : मराठवाड्यात अखेर पावसाने दमदार एन्ट्री घेतली आहे. परभणीत ढगफुटीसदृश पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, तर जालना व हिंगोलीत पूरस्थिती निर्माण झाली.

दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या या पावसाने माना टाकलेल्या पिकांना नवजीवन दिलं असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं आहे. काही भागांत अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे, मात्र बळिराजाला पुन्हा एकदा आशेचा किरण मिळाला आहे.

मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाने अखेर दमदार पुनरागमन केले. परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला, तर जालना व हिंगोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली. 

या पावसामुळे नद्यांना पूर आला असून, माना टाकत असलेल्या पिकांना जीवनदान मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

परभणीत ढगफुटीसदृश पाऊस; नद्यांना पूर

परभणी जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू झाली. जिंतूर तालुक्यातील वाघी व नवहत्ती शिवारात ढगफुटीसदृश पावसाने कहर केला.

जिंतूर – १३७ मिमी

वाधीधानोरा – १६५.३ मिमी

सेलू – ११४.३ मिमी

या भागांत नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. दुधना व कसुरा नद्या पाण्याने भरल्या. पाथरी, मानवत व सेलू तालुक्यातही दमदार पावसाची नोंद झाली. मात्र, सोनपेठ, गंगाखेड, पालम व पूर्णा तालुक्यात अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे.

जालना जिल्ह्यात १० मंडळांत अतिवृष्टी

जालना जिल्ह्यात गुरुवारी सकाळपर्यंत सरासरी २७ मिमी पावसाची नोंद झाली.

घनसावंगी – ८९.७ मिमी

तीर्थपुरी – ११७ मिमी

आष्टी – ९६.३ मिमी

या भागांत नद्या, ओढ्यांना पूर आला असून शेतात पाणी साचले. जांबसमर्थ, कुंभार पिंपळगाव, रांजणी व राणीउंचेगाव या मंडळांतही जोरदार पाऊस झाला. वालूर-सेलू रस्त्यावर पूर आल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

हिंगोली जिल्ह्यातही दमदार पाऊस

हिंगोली जिल्ह्यात आठवडाभरानंतर बुधवारी रात्रीपासून पाऊस कोसळला. हिंगोली, वसमत, डोंगरकडा, कळमनुरी, औंढा नागनाथ व सेनगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. 

पुनर्वसू नक्षत्राच्या अखेरच्या दोन दिवसांत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पिकांना नवसंजीवनी

गेल्या काही आठवड्यांपासून पावसाअभावी मराठवाड्यातील पिकांची वाढ खुंटली होती. या पावसामुळे शेतांमध्ये पुन्हा हिरवाई दिसू लागली आहे. नद्यांना पूर आल्यामुळे भूजल पातळीही सुधारण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. खरिपातील सोयाबीन, मूग व कापूस पिकांना या पावसामुळे जीवदान मिळाले.

परभणी जिल्ह्यातील पाऊस

तालुका/मंडळपाऊस (मिमी)
पाथरी७०.१
जिंतूर६१.५
सेलू७१
मानवत४७.५
वाघीधानोरा१६५.३
जिंतूर१३७

पुनर्वसू नक्षत्राच्या 'घोड्या'ने दिली साथ 

पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने बुधवारी रात्री दमदार हजेरी लावली. गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत रिपरिप सुरूच राहिली. पुनर्वसू नक्षत्र १८ जुलैला संपत आहे. परंतु, पुनर्वसू नक्षत्राच्या 'घोड्या'ने शेवटी २ दिवसांत चांगला पाऊस पाडला. १९ जुलैपासून सुरू होणाऱ्या पुष्य नक्षत्राकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : वादळी वारा, विजांचा कडकडाट अन् मुसळधार पाऊस; कुठे रेड, कुठे यलो अलर्ट? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रपाऊसजालनापरभणीहिंगोलीशेतकरीशेतीहवामान अंदाजमराठवाडापीक