Marathawada Weather Update : मराठवाड्यासाठी पुढील काही दिवसांसाठी वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेसह पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, पुणे येथून पुढील पाच दिवसांचा मराठवाड्यासाठी हवामान अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Marathawada Weather)
मराठवाड्यात २३ मेपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही भागांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या प्रकारच्या पावसाची शक्यता असून, या हवामान बदलामुळे शेतकरी वर्ग व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तापमानातही २ ते ४ अंशांनी घट होण्याची शक्यता असून, उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. (Marathawada Weather)
वादळी वाऱ्यासह पाऊस
आज (२१ मे) रोजी छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मूसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. लातूर, नांदेड, परभणी, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांतही काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. (Marathawada Weather)
२२ मे रोजी छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.
२३ मे रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलकासा ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असून, मराठवाड्याच्या अन्य भागांतही हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
तापमानात होणार बदल
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवसांत मराठवाड्यात कमाल तापमानात २ ते ४ अंश सेल्सियसने घट होणार आहे. तर किमान तापमानातही हळूहळू २ ते ४ अंश सेल्सियसची घट होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* उघड्यावर ठेवलेली धान्ये, खतांचे गोदामे सुरक्षित ठिकाणी हलवावीत.
* आकाशात विजांचा कडकडाट सुरू असल्यास उघड्यावर किंवा झाडांच्या खाली थांबू नये.
* शेतीकाम करताना काळजी घ्यावी आणि विजेच्या खांबांपासून सुरक्षित अंतरावर थांबावे.
* प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सज्ज ठेवावे.
मराठवाड्यात हवामान (Marathawada Weather) अस्थिर राहणार असून, वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतीसाठी नियोजन करताना आणि दैनंदिन कामांमध्ये नागरिकांनी खबरदारी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.