Maharashtra Weather Update : वातावरणातील सततच्या बदलांमुळे देशभरात हवामानाची उलथापालथ सुरू असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रासह अनेक राज्यांसाठी थंडीच्या लाटेचा मोठा इशारा जारी केला आहे.(Maharashtra Weather Update)
उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी वाढत असून, त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होताना दिसत आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील काही भागांत गारठा अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.(Maharashtra Weather Update)
उत्तर भारतात थंडीचा कडाका, महाराष्ट्रावर परिणाम
उत्तर भारतात सध्या कडाक्याचा गारठा अनुभवायला मिळत आहे. हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल आणि चंदीगड या भागांमध्ये शीतलहरीचा प्रभाव वाढत असून तापमान सतत घसरत आहे.
उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही गारठा वाढला असून पुढील काही दिवसांत थंडीचा जोर अधिक वाढणार असल्याचे संकेत आहेत.
राज्यात कुठे किती तापमान?
राज्यातील काही भागांत किमान तापमानाने नवे विक्रम नोंदवले आहेत.
गोंदिया: ७ अंश सेल्सिअस (यंदाचे सर्वात कमी तापमान)
धुळे: ८ अंश सेल्सिअस
नागपूर: ७.८ अंश सेल्सिअस
वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या अवकाळी पावसानंतर तापमानात वाढ झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पारा झपाट्याने खाली येत असल्याचे चित्र आहे.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तापमान सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांनी घसरले असून थंडीची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पुण्यात पुन्हा गारठा
किमान तापमानात झालेल्या घटीनंतर पुण्यातही थंडी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने थंडी काहीशी ओसरली होती.
मात्र, मंगळवारी एका दिवसात किमान तापमानात तब्बल ३ अंश सेल्सिअसने घट नोंदवली गेली. पुढील तीन दिवस हवामान तुलनेने स्थिर राहील, मात्र थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
७ जानेवारीचा हवामान अंदाज
थंड वाऱ्यांनी राज्याचा उंबरठा ओलांडला असून, येत्या २४ तासांत थंडीचा जोर अधिक वाढणार आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४ ते ५ दिवसांत उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतात दाट धुके व शीतलहरीचा प्रभाव अधिक तीव्र होणार आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातील विदर्भ आणि उत्तर भागांमध्ये प्रामुख्याने जाणवेल.
मुंबईत धुक्याची चादर
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही हवामानात बदल जाणवू लागला आहे. मंगळवारी पहाटेपासून शहरात दाट धुके पाहायला मिळाले असून दृश्यमानता कमी झाली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
उत्तरेकडील थंडीच्या लाटेसोबतच बंगालच्या उपसागरातही हवामानातील हालचाली वाढल्या आहेत. उपसागराच्या दक्षिण-पूर्व भागात आणि लगतच्या हिंदी महासागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.
६ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता ही प्रणाली तयार झाली असून पुढील २४ तासांत ती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम दक्षिण भारत आणि पूर्व किनारपट्टीवरील राज्यांवर होणार आहे.
दक्षिण भारतात पावसाचा अंदाज
हवामान विभागाने ८ आणि ९ जानेवारी रोजी तामिळनाडूमध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
तसेच ९ आणि १० जानेवारी रोजी तामिळनाडू व केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
४ दिवसांत थंडीची लाट
बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीमुळे ओडिशामध्ये रात्रीच्या तापमानात २ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यता आहे.
कंदमाल आणि कोरापुटसारख्या डोंगराळ भागांत दाट धुक्यामुळे दृश्यमानता केवळ २० मीटरपर्यंत खाली आली आहे.
पुढील चार दिवसांत या भागांत शीतलहरीचा प्रभाव अधिक वाढणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
देशभरात हवामानात अनेक बदल अनुभवायला मिळत असून महाराष्ट्रातही थंडीची लाट अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* हरभरा, गहू, ज्वारी, मका या पिकांवर शीतलहरीचा परिणाम होऊ शकतो.
* सकाळी लवकर किंवा उशिरा रात्री फवारणी टाळावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
