ऑगस्ट पहिल्या आठवडाअखेर झालेल्या पावसाची टक्केवारी-
               
मान्सूनच्या गेल्या सव्वादोन महिन्यात,  मराठवाड्यात सरासरीइतक्या तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद केली. 
महाराष्ट्रात ७ ऑगस्ट अखेर झालेला पाऊस व त्याची टक्केवारी
महाराष्ट्रातील चार विभागवार पावसाची टक्केवारी 
               
i) मराठवाडा ४१ सेमी. (१९%+), कोकण २७४ सेमी. (३९%+), विदर्भ ७४ सेमी.(३१%+), म. महाराष्ट्र (खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हे) ६५ सेमी.(४६%+) 
जिल्हावार पावसाची टक्केवारी 
               
ii) सरासरीपेक्षा अत्याधिक पावसाचे २ जिल्हे - पुणे व सांगली (६७%+), सरासरीपेक्षा कमी पावसाचा जिल्हा-हिंगोली (४७% वजा), सरासरी इतक्या पावसाचे ९ जिल्हे नंदुरबार, छ.सं.नगर, जालना, नांदेड, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया (-१९ ते १९‰), उर्वरित २४ जिल्हे हे सरासरीपेक्षा अधिक पावसाचे (२० ते ५९‰+) 
            
ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यातील सध्याचा चालु पाऊस?
                 
ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्या (८ ते १५ ऑगस्ट) दरम्यान मुंबईसह कोकण, विदर्भासहित संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचीच शक्यता असल्यामुळे सध्या कमीच पावसाची नोंद होत आहे. परंतु नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा अपवाद असुन तेथील धरण पाणलोट क्षेत्रात सध्या होत असलेल्या मध्यम पावसातून धरण जल-आवकेतील सातत्य टिकून आहे. 
          
ऑगस्टच्या तिसऱ्या (रक्षाबंधन)आठवड्यातील होणाऱ्या पावसाची शक्यता? 
परवा शुक्रवार दि.१६ ते रविवार दि.२५ ऑगस्ट म्हणजे गोकुळ अष्टमी उजाडे पर्यन्तच्या १० दिवसात महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यात एम.जे.ओ. मुळे पावसासाठी अनुकूलता वाढू शकते.
              i) मुंबई शहर, उपनगर, रायगड, ठाणे, पालघर, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छ.सं.नगर, अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली अशा २२ जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक अशा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. त्यामुळे या आठवड्यातही घाटमाथ्यावरील धरणांच्या जल-आवकतेतील सातत्य मात्र तसेच टिकून राहील. त्यात बदल नाही.
             ii) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, संपूर्ण मराठवाडा (छ.सं.नगर वगळता) बुलढाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ अशा १४ जिल्ह्यात सरासरी इतक्या अश्या केवळ मध्यम पावसाचीच शक्यता जाणवते.            
            
पावसाच्या स्वरूपातही जाणवू शकतो किंचित बदल! 
                  
सध्या दुपार ३ वाजेचे कमाल तापमान हे अधिक जाणवत आहे. त्यामुळे 'उष्णता संवहनी' प्रक्रियेतून उरध्वगामित झालेल्या दमट बाष्पाचा, अधिक उंचीवर  समुद्रावरून अगोदरच संक्रमणित झालेल्या थंड बाष्पाशी संयोग घडून येतो. ह्या दोन वेगळ्या तापमानाच्या बाष्पातून क्यूमुलोनिंबस' प्रकारचे ढगनिर्मिती व त्यात होणाऱ्या सांद्रीभवनातून पाऊस होतो. त्यामुळे ह्या पुढील १० दिवसात शक्यतो दुपारनंतर, मर्यादित क्षेत्रावर, वीजा व  गडगडाटीसह पावसाची शक्यताही नाकारता येत नाही. 
- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd.)
IMD Pune.
