Maharashtra Rain : मागील दोन ते तीन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सूनोत्तर पाऊस पडताना दिसत आहे. मान्सूनच्या परतीचा पाऊस संपून दोन आठवले उलटले तरीही विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली असून या पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर वेचणीला आलेल्या कापसाचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
का पडतोय पाऊस?
गेल्या आठवड्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये दोन कमी दाबाचे पट्टे तयार झाले होते. यामुळे महाराष्ट्रावर आर्द्रतेचे प्रमाण वाढले. यामुळे काही दिवस विजेच्या कडकडाटासह पाऊस दिसून आला. पण सध्या पडणारा पाऊस हा चक्रीवादळामुळे पडतो आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळामध्ये रूपांतर झाले असून त्याला मोंथा चक्रीवादळ असे नाव देण्यात आलेले आहे. हे चक्रीवादळ आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर २८ ऑक्टोबर रोजी धडकले आहे. यामुळे बंगालच्या उपसागराची किनारपट्टी, आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यात आणि महाराष्ट्रात या पावसाची तीव्रता अधिक आहे.
मोथा चक्रीवादळामुळे पडत असलेल्या पावसाची तीव्रता विदर्भात सर्वांत जास्त आणि त्यानंतर मराठवाड्यात आहे. पश्चिम महाराष्ट्रात या पावसाची तीव्रता कमी असून कोकणातही मुसळधार पाऊस पडत आहे. येणाऱ्या २ दिवसांत या पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
विदर्भात मागील २४ तासात आणि मराठवाड्यातही या पावसाची तीव्रता अधिक दिसून आली असून या पावसाची तीव्रता आज म्हणजे २९ ऑक्टोबर रोजी जास्त, ३० ऑक्टोबर रोजी कमी आणि ३१ ऑक्टोबर रोजी अजून कमी होऊन १ नोव्हेंबरपासून वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे.
- डॉ. एस. डी. सानप (IMD पुणे)
