बालाजी बिराजदार
धाराशिव जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पातून शनिवारी (१६ ऑगस्ट) सकाळी सात वाजता धरणाचे दहा दरवाजे प्रत्येकी १० सेंटीमीटरने उघडण्यात आले. या माध्यमातून ३८०६.५६ घनमीटर प्रति सेकंद (क्यूसेक्स) वेगाने पाण्याचा विसर्ग तेरणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे.(Lower Terana Project)
धरणातील वाढत्या पाणलोट क्षेत्रातील पाणी पाहता पुढील काही तासांत विसर्गात वाढ अथवा घट करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.(Lower Terana Project)
गावकऱ्यांना दिला सतर्कतेचा इशारा
या विसर्गामुळे तेरणा नदीकाठच्या गावांना संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिक, शेतकरी आणि पशुपालक यांनी सतर्क राहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग क्र. ३ लातूर यांनी केले आहे.
विशेष सूचना
गोठे, जनावरे, शेतीपिके व विजेच्या मोटारी सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात.
नदीपात्रात अनावश्यक वावर टाळावा.
मूल्यवान वस्तू आणि घरगुती साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे.
प्रशासनाचे आवाहन
लोहारा, उमरगा, औसा आणि निलंगा तालुक्यांतील तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आणि पोलीस पाटील यांच्या मार्फत ही माहिती संबंधित गावांमध्ये पोहोचविण्यात आली आहे.
धरणातील पाण्याची आवक पाहून विसर्गात वेळोवेळी बदल केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. – एस. बी. गंभीरे, शाखा अभियंता, निम्न तेरणा प्रकल्प, माकणी