Nar Par Yojana : नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास जलसंपदा विभागाकडून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून, त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात नार-पार-औरंगा या तीन पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातून 10.64 TMC (10640 Mcft) पाणी गिरणा खोऱ्यात वळविणे प्रस्तावित आहे.
नार-पार-औरंगा खोऱ्यातील जल निष्पत्तीचा अद्ययावत अभ्यास जलसंपदा विभागामार्फत शासन स्तरावर तसेच क्षेत्रीय स्तरावर प्रगतीत असून, त्याअन्वये टप्पा 2 मध्ये सुमारे 20.66 TMC (20659 Mcft) पाणी गिरणा खोऱ्यात वळविण्यासाठी उपलब्ध होईल असा प्राथमिक अंदाज आहे.
टप्पा 2 मध्ये उपलब्ध होणाऱ्या सुमारे 20.66 TMC पाण्यातून पाणी वापरासाठी मानक नकाशा वरील प्राथमिक अभ्यासानुसार चणकापुर धरणातून अस्तित्वातील डाव्या तीरावरील सा.क्र. 405 मी. वरील विमोचकाचे सिल तलांक 662.85 मी. पासून डाव्या कालव्याची संरेखा सुमारे 1:2500 ते 1:3000 या उतारानुसार निश्चित करून नकाशात शीघ्र संदर्भासाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
सदर कालव्याद्वारे गुरुत्वीय पद्धतीने पाणी देणे शक्य होणार असून, सुमारे 72 कि.मी. लांबीच्या कालव्याद्वारे कळवण, सटाणा, मालेगाव तालुक्यातील माळमाथा भाग तसेच अवर्षणग्रस्त भागाचे सुमारे 1,24,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते. तसेच पुनद नदी, आरम नदी, हत्ती नदी, कण्हेर नदी, करंजाडी नदी व मोसम नदी पुनर्जीवित होणार असून परिसरातील सिंचन क्षेत्र समृद्ध होण्यास मदत होणार आहे.
"चणकापुर प्रकल्पातून डावा कालवा प्रस्तावित केल्यास कायम दुष्काळी कळवण, सटाणा व मालेगाव तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागांना नवसंजीवनी मिळणार असल्याने सदर कालव्याचे सविस्तर सर्वेक्षण व अन्वेषण पूर्ण होऊन डावा कालवा प्रस्तावित करावा, अशी मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांचेकडे मागणी केली आहे."
"नार- पार-गिरणा नदीजोड प्रकल्पातून दुसऱ्या टप्प्यात वळविण्यात येणाऱ्या पाणी उपलब्धतेतून चणकापुर धरणातून डाव्या कालव्याद्वारे तसेच नदीद्वारे सिंचनाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ होणारी गावे" ही पुढील प्रमाणे आहेत:
प्रस्तावित चणकापुर डावा कालव्याद्वारे कळवण तालुक्यातील जयपुर, गोसराणे, गोपालखडी, जामनेपाळे, रवळजी, देसराणे, दरेभणगी या गावांना सिंचनाचा लाभ होणार आहे. पुनद नदीद्वारे मोकभणगी पासुन भादवणपर्यंत सिंचनाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ होणार आहे.
प्रस्तावित चणकापुर डावा कालव्याद्वारे बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे, दहिंदुले, चाफ्याचा पाडा, कपालेश्वर, किकवारी (खु.), किकवारी (बु.), विंचूर, डोंगरेज, विरगांव, आव्हाटी, बंधारपाडा, भूयाणे, निताने, पारनेर, लाडुद, सोमपुर या गावांना सिंचनाचा लाभ होणार आहे. आरम नदीद्वारे डांगसौंदाणे ते सटाणा पर्यंत, हत्ती नदीद्वारे कपालेश्वर ते सटाणा पर्यंत, कण्हेर नदीद्वारे विरगांव ते वटार पर्यंत, करंजाडी नदीद्वारे भुयाणे ते आसखेडा पर्यंत, मोसम नदीद्वारे सोमपुर ते नामपुर पर्यंतच्या गावांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार आहे.
प्रस्तावित चणकापुर डावा कालव्याद्वारे मालेगाव तालुक्यातील मोसम नदीद्वारे वळवाडे, खाकुर्डी, वडनेर, अजंग, वडेल, काष्टी, वजीरखेडे, वडगांव व मालेगाव पर्यंतच्या गावांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार आहे. त्यामुळे या सर्व भागांतील शेतकऱ्यांना सिंचन व पिण्याच्या पाण्याची शाश्वत उपलब्धता निर्माण होऊन परिसराच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
