नाशिक : सततच्या पावसामुळे चणकापूर व पुनंद धरणातील (Chankapur Dam) जलस्तर वाढत असल्यामुळे अर्जुनसागर (पुनंद) धरणातून २४०० क्यूसेकने पुनंदमध्ये, तर चणकापूरमधून २२३२ क्यूसेकने गिरणा नदी पात्रात पूरपाण्याचा विसर्ग सुरू आहे. या विसर्गाने पुनंद व गिरणा खळाळून वाहत असून, प्रशासनाने नदी काठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात कळवण शहर व तालुक्यातील गेल्या तीन-चार दिवसांपासून काही भागात पाऊस सुरूच आहे. गेल्या १८ जूनपासून अर्जुन सागर (पुनंद) धरणातून पूरपाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू असून, धरणाचा जलस्तर वाढताच पाण्याचा विसर्ग वेगाने सुरू केला जात आहे. गिरणा व पुनंद नद्यांच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी दिल्या आहेत.
चणकापूर धरणातून सकाळी १०.३० वाजता १४८८ क्यूसेकने, तर दुपारी १२ वाजता २२३२ क्यूसेक पूरपाणी गिरणा नदीपात्रात विसर्ग करण्यात आले आहे. सध्या चणकापूर धरणात १९७७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. तालुक्यातील पुनंद, गिरणाबरोबर तालुक्यातील नदी व नाले दुथडी भरून वाहू लागले आहे.
धरण क्षेत्रात पाऊस होत असल्याने पातळी वाढली
धरण परिचालन सुचिनुसार, धरणातील पाणी साठ्यातील झपाट्याने होणारी वाढ, पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची वाढ लक्षात घेऊन अर्जुन सागर (पुनंद) धरणातून पुनंद नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढवला जात आहे. कळवण तालुक्यातील धार्डेदिगर, मळगाव (चिंचपाडा), बोरदैवत, भांडणे, खिराड, धनोली, भेगू, जामले, नांदुरी ही लघुपाटबंधारे प्रकल्प १०० टक्के पाण्याने फुल्ल भरले आहे.
आणखी विसर्गाची शक्यता
गोबापूर लघुपाटबंधारे प्रकल्पाचा सांडवा आपत्कालीन परिस्थितीमुळे तोडण्यात आल्यामुळे पाणीसाठा होत नसून ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. चणकापूर व पुनंद धरण क्षेत्रात पुढील कालावधीत पाण्याची वाढणारी आवक बघून टप्प्याटप्याने पाण्याचा विसर्ग वाढवावा लागणार असल्यामुळे गिरणा व पुनंद नदीकाठच्या नागरिकांनी नदी प्रवाहात जाऊ नये, नदीकाठलगतच्या आपली पशु-धन, चीजवस्तू, शेती मोटारपंप सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दहावी उत्तीर्ण आहात, गावातच काम मिळणार, दीड लाख अनुदान मिळतंय, इथं अर्ज करा