Katepurna Dam Water Release : काटेपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. (Katepurna Dam Water Release)
धरण सुरक्षेच्या दृष्टीने शुक्रवारी (५ सप्टेंबर) दुपारी ३ वाजता धरणाचे आठ गेट प्रत्येकी ६० सेंटिमीटर (सुमारे दोन फूट) उघडण्यात आले. या निर्णयामुळे नदीपात्रात एकूण ३८४.४६ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.(Katepurna Dam Water Release)
जलसाठा ९६.४२ टक्क्यांवर
धरणातील पाण्याची पातळी ३४७.५८ मीटर इतकी झाली असून, जलसाठा ८३.२६१ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ९६.४२ टक्के इतका नोंदवला गेला आहे. डव्हा, काटा, कोंडाला, जऊळका रेल्वे, अमनवाडी, मुसळवाडी, धानोरा आणि फेट्रा परिसरातील मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढल्याने गेट उघडण्याची वेळ आली.
नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
धरणातून सुरू झालेल्या विसर्गामुळे काटेपूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. विसर्ग सुरू असताना नदीपात्रातून ये-जा टाळावी, असेही सांगण्यात आले.
प्रशासन सतर्क
विसर्ग सुरू असताना धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार आवश्यकतेनुसार विसर्गात वाढ-घट केली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे, उपविभागीय अधिकारी आदित्य कासार यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता संदीप नेमाडे व कर्मचारी मनोज पाठक सतत दक्षता घेत आहेत.
हे ही वाचा सविस्तर : Marathwada Dam Water Level : पावसाची कृपा! जायकवाडी धरण किती भरले वाचा सविस्तर