अनिस शेख
महान : रब्बी हंगाम संपताच काटेपूर्णा धरणातून शेती सिंचनासाठी होणारा पाणीपुरवठा ३१ मार्चपासून पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.(Katepurna Dam Water Level)
सध्या धरणात सुमारे ३५.११ टक्के जलसाठा शिल्लक असून, उपलब्ध पाणी केवळ पिण्याच्या गरजांसाठी राखून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात सिंचनासाठी पाणी देण्यात येणार नसल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.(Katepurna Dam Water Level)
पिण्याच्या पाण्यालाच प्राधान्य
काटेपूर्णा धरणातून अकोला शहरासह मुर्तिजापूर, बोरगाव मंजू, अकोला एमआयडीसी, महान येथील मत्स्य बीज केंद्र तसेच खांभोरा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुमारे ६४ गावांना वर्षभर पिण्याचे पाणी पुरवले जाते. सध्याचा जलसाठा लक्षात घेता उन्हाळाभर पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
रब्बी हंगामाला मिळाला आधार
गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरण १०० टक्के भरले होते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.
परिणामी नदीकाठावरील सुमारे ६,७०० हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांना रब्बी पिके घेता आली. मात्र हंगाम संपताच आता सिंचनासाठी पाणी बंद करण्यात आले आहे.
सध्याची धरणस्थिती
जलसाठा : ३५.११%
पाणीपातळी : ३४.७६%
एकूण क्षमता (तुलनात्मक) : मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे १०% अधिक साठा
अकोला शहरासाठी बसवलेले ५ व्हॉल्व्हपैकी १ व्हॉल्व्ह सध्या पाण्याबाहेर
पावसाचा अंदाज चिंताजनक
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी आतापासूनच काटकसरीने पाणी वापरण्याची गरज आहे.
प्रशासनाचे आवाहन
पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे यांनी नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच महान येथील कर्मचारी मनोज पाठक यांनीही पाणी जपून वापरण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
सध्याचा जलसाठा पाहता उन्हाळाभर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, असा प्रशासनाचा दावा आहे.
मात्र, पावसाळा कमी पडल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी आत्तापासूनच पाणी बचतीची सवय लावणे गरजेचे आहे.
