Jayakwadi Dam Water Release : सप्टेंबरमध्ये आलेल्या महापुराच्या जखमा अजूनही ताज्या असतानाच नदीपात्रातील वाढत्या पाण्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. (Jayakwadi Dam Water Release)
यंदा कोल्हापुरी बंधारा आधीच चार वेळा पाण्याखाली गेला असून, आता तो पाचव्यांदा बुडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. (Jayakwadi Dam Water Release)
दिवाळीनंतर हवामान स्थिर होईल, अशी अपेक्षा असताना पुन्हा एकदा गोदावरी नदीचं पात्र दुथडीभरून वाहू लागले आहे. पैठण येथील नाथसागर (जायकवाडी) धरणातून बुधवारी तब्बल ३७ हजार ७२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्याने शहागड परिसरात नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे कोल्हापुरी बंधारा पुन्हा एकदा पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Jayakwadi Dam Water Release)
शहागड परिसरात पुन्हा वाढलेलं पाणी
मागील चार महिन्यांपासून शहागड परिसरात गोदावरी दुथडीभरून वाहत आहे. सप्टेंबर महिन्यात आलेल्या महापुरानंतर परिस्थिती काहीशी स्थिर झाली होती. मात्र बुधवारी धरणातून वाढवलेला विसर्ग पाहता, गुरुवारी दिवसभर नदीपातळीत हळूहळू वाढ होताना दिसली.
स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर पुढील काही तासांत पुन्हा पावसाचा जोर वाढला आणि धरणातून विसर्गात वाढ झाली, तर शहागडचा कोल्हापुरी बंधारा यंदा पाचव्यांदा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
पाण्याचा विसर्ग आणि स्थितीचा आढावा
बुधवार (२९ ऑक्टोबर) : ३७ हजार ७२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग
गुरुवार (३० ऑक्टोबर) : आवक कमी झाल्याने १८ हजार क्युसेक विसर्ग
वरच्या भागातून येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊनच विसर्ग नियंत्रित केला जातो. पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहिल्यास पाण्याचा विसर्ग आणखी कमी केला जाऊ शकतो.- मंगेश शेलार, शाखा अभियंता
हवामान बदलाचं संकट कायम
दिवाळीनंतर हिवाळ्याची चाहूल लागण्याऐवजी, राज्यात अजूनही अधूनमधून पावसाचे झटके सुरूच आहेत. त्यामुळे शहागड परिसरात जमिनी ओली राहून रब्बी हंगामाची तयारी प्रभावित होत आहे. सप्टेंबरमधील महापुराच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा पाण्याची वाढ झाल्यानं स्थानिक नागरिक व शेतकरी तणावाखाली आहेत.
माती वाहून गेली
यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याने अनेक ठिकाणी पिके वाहून गेली, सुपीक मातीचा थर नष्ट झाला. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी रब्बी पिकांसाठी जमिनीची तयारी करणे हे मोठं आव्हान बनलं आहे.
आता जमिनीवर पिके नाहीतच, पण मातीही वाहून गेली आहे. अशी परिस्थिती आम्ही कधीच पाहिली नव्हती, असं एका शेतकऱ्याने दुःख व्यक्त केलं.
शेतकऱ्यांची व्यथा
अनेक वर्षात असा पाऊस झाला नव्हता. या वर्षी पावसाने शेतीच नाही, तर शेतकऱ्यांची स्वप्नं वाहून गेली. काही दिवसांपूर्वी आम्ही भयानक पूर परिस्थितीचा सामना केला. आता पुन्हा ती वेळ नको. - मधुकर मापारी, शेतकरी
शासनाच्या मदतीकडे सर्वांचे डोळे
अतिवृष्टीच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असला तरी अद्याप प्रत्यक्ष नुकसानभरपाई मिळालेली नाही. शेतकरी बांधव शासनाच्या मदतीची प्रतीक्षा करत आहेत. स्थानिकांनी मागणी केली आहे की, नदीकाठच्या भागात प्रशासनानं सतत लक्ष ठेवावं, आणि संभाव्य पुरस्थितीसाठी आधीच तयारी करावी.
तज्ज्ञांचा इशारा
हवामान तज्ज्ञांच्या मते, जर पुढील काही दिवसांपर्यंत विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात पाऊस कायम राहिला, तर गोदावरी नदीच्या काठावर पुन्हा पाणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्कतेने पावले उचलण्याची गरज आहे.
