छत्रपती संभाजीनगर : यंदा मराठवाड्यातील बहुतांश लहान, मध्यम आणि मोठी धरणे पाण्याने तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. (Jayakwadi Dam Water Release)
लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने (कडा) रब्बी तसेच उन्हाळी हंगामासाठी प्रत्येकी तीन-तीन आवर्तने देण्याचा निर्णय घेतला असून, यानुसार रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन जायकवाडी प्रकल्पातून सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ही माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रशासक तथा अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांनी दिली.(Jayakwadi Dam Water Release)
मराठवाड्यात यंदा दिवाळीपर्यंत पाऊस झाल्यामुळे धरणांमध्ये समाधानकारक ते मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे जायकवाडी प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के भरला असून, त्यामुळे सिंचनाच्या दृष्टीने यंदाचे वर्ष अत्यंत अनुकूल ठरणार आहे.(Jayakwadi Dam Water Release)
१५ ऑक्टोबरनंतर पाणी नियोजन
दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी राज्यातील धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्याचा सविस्तर आढावा घेतला जातो. त्यानंतर उपलब्ध पाण्याचे कृषी सिंचन, औद्योगिक वापर तसेच पिण्याच्या पाण्यासाठी नियोजन केले जाते.
यासाठी जलसंपदा मंत्री आणि संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात येते. या बैठकीत पाणी सोडण्याबाबत अंतिम निर्णय घेतले जातात.
१ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट
लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रशासक तथा अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या जिल्ह्यांतील सुमारे १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जायकवाडी कालव्याद्वारे रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सुरू करण्यात आले आहे. रब्बीसाठी आणखी दोन आवर्तने देण्यात येणार असून, त्यानंतर उन्हाळी हंगामातील पिकांसाठीही तीन आवर्तने दिली जाणार आहेत.
आचारसंहिता असली तरी पाणी सोडण्यास मंजुरी
यंदा नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू होती. सध्या महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असून, येत्या काही दिवसांत जिल्हा परिषद निवडणुकांसाठीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत कालवा सल्लागार समितीची औपचारिक बैठक घेणे शक्य नसले, तरी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून जलसंपदा मंत्र्यांनी पाणी सोडण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे सब्बीनवार यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा
जलसाठ्यांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असल्याने यंदा रब्बी व उन्हाळी हंगामात सुमारे १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यामुळे रब्बी पिकांसह उन्हाळी पिकांचे उत्पादन वाढण्याची शक्यता असून, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
