Jayakwadi Dam Update : नाशिक आणि पाणलोट क्षेत्रातील दमदार पावसानंतर जायकवाडी धरणाने पुन्हा एकदा जलसंपन्नतेकडे वाटचाल सुरू केली आहे.(Jayakwadi Dam)
उर्ध्व भागात पाऊस थांबला असला तरी सध्या धरणात १८ हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. पाणीसाठा ७४.४५ टक्क्यांवर पोहोचल्यामुळे परिसरात नजरेस भरेल तिथपर्यंत पाणी पाणीच दिसत असून शेतकऱ्यांसह नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.(Jayakwadi Dam)
नाशिकसह गोदावरीच्या उगम भागात झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणात चांगलीच आवक झाली असून धरणातील पाणीपातळीने पंचाहत्तरीकडे झेप घेतली आहे. (Jayakwadi Dam)
शनिवारी (१२ जुलै) सायंकाळपर्यंत धरणाची पाणीपातळी ७४.४५ टक्क्यांवर पोहोचली. उर्ध्व भागात पाऊस थांबल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग काहीसा कमी झाला असूनही सध्या १८ हजार १०३ क्युसेक वेगाने आवक सुरू आहे, अशी माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली.(Jayakwadi Dam)
सध्याची स्थिती
पाणीसाठा : ७४.४५%
पाणीपातळी : १५१६.९० फूट
एकूण पाणीसाठा : २३४७.०५४ दलघमी
सध्याची आवक : १८,१०३ क्युसेक
पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबल्याचा परिणाम
नाशिक जिल्ह्यात आणि जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात मागील तीन दिवसांपासून पाऊस बंद आहे. यामुळे धरणात होणाऱ्या पाण्याची आवक तुलनेने कमी झाली आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला गोदावरी खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठा वेगाने वाढला होता.मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात पाणी धरणात आल्याने परिसरात नजर जाईल तिथपर्यंत पाणी पाणीच दिसत आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
धरणातील पाणीसाठा समाधानकारक असल्याने पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठीच्या पाण्याचा तुटवडा भासणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
धरण परिसरात मात्र पाण्यामुळे काही ठिकाणी धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
जायकवाडी धरणातील पाणीपातळी हंगामाच्या मध्यावरच ७५ टक्क्यांच्या जवळ पोहोचल्यामुळे जलसंपत्तीची स्थिती चांगली आहे. पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यास धरण लवकरच शंभर टक्के क्षमतेने भरू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.