Jayakwadi Dam Update : नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. त्याचा परिणाम जायकवाडी धरणात दिसू लागला असून धरणात झपाट्याने पाण्याची आवक वाढली आहे. (Jayakwadi Dam Update)
सोमवारी संध्याकाळपर्यंत पाणीसाठा ५५.३७ टक्के इतका झाला असून धरण प्रशासनाने पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करून अलर्ट जारी केला आहे.
गेल्या दोन–तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. यामुळे जायकवाडी धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असून सोमवारी (८ जुलै) सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणात ४६ हजार ६६७ क्युसेकने पाण्याची आवक नोंद झाली. (Jayakwadi Dam Update)
रविवारी संध्याकाळपर्यंत धरणात १६ हजार २९६ क्युसेकने पाण्याची आवक होती आणि पाणीसाठा ५०.५७ टक्के इतका झाला होता. मात्र, गेल्या २४ तासांत पाण्याची आवक वाढून पाणीसाठा ५५.३७ टक्यांवर पोहोचला आहे. (Jayakwadi Dam Update)
धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता पाटबंधारे विभाग सतर्क झाला असून पूर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कक्ष कार्यरत झाला आहे.
या नियंत्रण कक्षात उपअभियंता श्रद्धा निंबाळकर, शाखा अभियंता मंगेश शेलार, रितेश भोजने, गणेश खरडकर आणि आबासाहेब गरुड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
धरणातील पाण्याची पातळी आणि गोदावरीच्या प्रवाहावर सातत्यानं लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली.
जायकवाडी परिसरातील गावांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.