विकास राऊत
मराठवाड्यात मागील पाच वर्षांपासून पावसाचा पॅटर्न बदलला आहे. अवकाळी, ढगफुटी, ओला व कोरड्या दुष्काळाच्या छायेत हा विभाग आल्यामुळे त्याचा परिणाम शेती, दळणवळणासह पर्यटनावर होतो आहे. (Irregular monsoon in Marathwada)
मराठवाड्याचा पावसाळा आता जुन्या वेळेसारखा राहिलेला नाही. मागील पाच वर्षांत विभागात पावसाचा पॅटर्न पूर्णपणे बदलल्याचे चित्र आहे. कधी ढगफुटीसारखी अतिवृष्टी, कधी दीर्घ कोरड्या दुष्काळाची छाया, तर कधी उशिरा पडणारा मुसळधार पाऊस या अस्थिरतेमुळे शेती, पर्यटन आणि जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे. (Irregular monsoon in Marathwada)
मानवी हस्तक्षेप, हवामान बदल आणि स्थानिक पर्यावरणीय घडामोडींमुळे पावसाचा हा ताळमेळ बिघडत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. (Irregular monsoon in Marathwada)
मराठवाड्याच्या पावसाच्या पॅटर्नमध्ये बदल हा केवळ निसर्गाच्या चक्रामुळे नाही, तर मानवी हस्तक्षेप, आगतिक हवामान बदल, पर्यावरणाचा हास आणि स्थानिक घटकामुळे होत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
मागील ५ वर्षांत मराठवाड्यात जून-जुलैमध्ये कमी पाऊस तर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अधिक पाऊस झालेला आढळत असून काही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊसही नोंदविण्यात आला आहे. २०२१ मध्ये विभागाच्या ६७९ मि.मी.च्या तुलनेत थोडा जास्त, २०२२ व २०२४ मध्ये सरासरीपेक्षा जास्त, तर २०२३ मध्ये कमी पाऊस झाला.
हवामानातील बदल
जागतिक तापमानवाढ, समुद्राचे तापमान वाढल्याने मान्सूनचे वारे आणि ढगांची स्थिती बदलत आहे. त्याचा परिणाम मराठवाड्यातील वातावरणावर होतो. त्यामुळे पाऊस अनियमित, उशिराने किंवा ढगफुटीसारखा होतो.
मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत १२६ मि.मी., म्हणजेच १८ टक्के पाऊस झाला. गेल्या वर्षी जून-जुलैच्या सरासरी तुलनेत २१३ मि.मी. म्हणजे १२५ टक्के पाऊस झाला होता. आठही जिल्ह्यात पावसाचा पॅटर्न बदलल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
तज्ज्ञ काय सांगतात ?
मराठवाड्यात १५ जुलैपर्यंत पाऊस नसेल. यावर्षी पावसाचा पॅटर्न वेगळा आहे. गेल्या दोन-तीन वर्षातील वेगळा होता. मध्य भारतात सध्या पाऊस याकाळात नसतो; पण तिकडे सुरू आहे. त्याचा परिणाम इकडे होतो. - श्रीनिवास औंधकर, हवामान अभ्यासक
तापमानाचे भोवरे होत आहेत
सौर वादळांमुळे तापमानाचे भोवरे तयार होत आहेत. त्यामुळे कमी दाबावा पट्टा तयार होऊन ढगफुटीसारखा पाऊस मराठवाड्यात होतो आहे. मराठवाड्यातील चार जिल्ह्यांमध्ये असा बदल दिसून येतो आहे. यावर्षी देखील पाऊस सरासरीपेक्षा जास्त होईल.- प्रा. किरणकुमार जोहरे, हवामानतज्ज्ञ
स्थानिक पर्यावरणीय बदल
जंगलतोड, जलाशयांतील प्रदूषण, शेतजमीन निवासी क्षेत्रात आणणे, याचा परिणाम पर्जन्यमानावर होत आहे. परिणामी, पाऊस एका ठिकाणी जास्त व दुसरीकडे कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे.
एल निनो, ला निनाचा प्रभाव
एल निनोमुळे प्रशांत महासागरात पाण्याचे तापमान वाढते, त्यामुळे विशेषतः मराठवाड्यात पावसाचे प्रमाण घटते. ला निनामुळे पावसाचे प्रमाण वाढते. हे दोन्ही चक्र २ ते ७ वर्षांत येतात आणि त्याचा थेट परिणाम मराठवाड्याच्या पावसावर होतो.
औद्योगिकीकरण व शहरीकरणाचा फटका
शहरे आणि औद्योगिक क्षेत्र वाढल्यामुळे 'हिट इफेक्ट' तयार होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ढगांची वाटचाल प्रभावित होते आणि पर्जन्यमानाचे वितरण बदलत आहे.
पूर्वी पाऊस जून ते सप्टेंबरदरम्यान संतुलित प्रमाणात पडायचा. आता कथी अतिवृष्टी, कधी उशिरा, तर कधी अवकाळीचे प्रकार वाढले आहेत. कुठे ढगफुटी, तर कुठे पाण्याची टंचाई असेही चित्र आहे.
४ वर्षांत विभागात झालेल्या पावसाची आकडेवारी (मिलीमीटरमध्ये)
जिल्हा | वार्षिक सरासरी | २०२१ | २०२२ | २०२३ | २०२४ |
---|---|---|---|---|---|
छत्रपती संभाजीनगर | ६७९ | ६९८ | ८२६ | ५४६ | ७४४ |
जालना | ७४९ | ७९५ | ८५३ | ६२१ | ८१९ |
बीड | ७५५ | ७२७ | ८६५ | ६०२ | ८३२ |
लातूर | ७१२ | ७४५ | ८२४ | ५९८ | ८१६ |
धाराशिव | ७४९ | ७७२ | ८२७ | ६३३ | ८४५ |
नांदेड | ९४७ | ९६५ | १०४७ | ७९५ | १०११ |
परभणी | ८७३ | ९०२ | ९८६ | ७१५ | ९५४ |
हिंगोली | ८४३ | ८९६ | ९८३ | ७३२ | ९६८ |