- सुनील चरपे
Dam Water Measurement : आपल्याकडे मोसमी वाऱ्यामुळे रोहिणी व मृग नक्षत्रापासून पावसाळा सुरू होतो. प्रत्येक पावसाळ्यात (Rainy Season) ठिकठिकाणांहून मुसळधार पाऊस कोसळल्याच्या, कुठे किती आणि कसा पाऊस झाला, यासोबतच धरणे, बंधारे भरल्याच्या आणि धरणांमधून पाणी सोडण्याच्या बातम्या वाचायला, ऐकायला व बघायला मिळतात.
हा पाऊस मिलिमीटर्समध्ये, सेंटिमीटरमध्ये अथवा इंचात मोजला गेल्याचे, तर धरणांमधील पाणीसाठा (Water Storage) दलघमी (दशलक्ष घनमीटर), तर त्यातील पाणी सोडल्याचे म्हणजेच पाण्याचा विसर्ग (Water Disrchaged) क्युसेक किंवा क्युमेकमध्ये मोजला जातो. पाणी मोजण्याच्या या युनिटबाबत वाचकांना कुतूहल असते. काय आहेत या संज्ञांमागील गणिते?
क्युसेक म्हणजे काय?धरणातून पाणी सोडताना पाण्याचे प्रमाण क्युसेकमध्ये मोजले जाते. एक घनफूट प्रतिसेकंद म्हणजेच क्यूब फूट पर सेकंद याचा अर्थ क्युसेक असा होतो. एक घनफूट पाणी म्हणजे २८.३१ लिटर पाणी. ज्यावेळी धरणातून १ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातो, त्यावेळी धरणातून २८.३१० लिटर पाणी प्रति सेकंदाला नदीपात्रात सोडले जाते. कोणत्याही धरणातून जर २४ तासांत सतत ११ हजार ५०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला, तर त्या धरणाची पातळी २४ तासांनंतर एक टीएमसी अर्थात (एक हजार दशलक्ष घनफूट) ने कमी झालेली असते.
क्युमेक म्हणजे काय?क्युसेकमध्ये पाणी घनफुटामध्ये मोजले जाते, तर क्युमेकमध्ये पाणी घनमीटरमध्ये (क्युबिक मीटर पर सेकंद) मोजले जाते. एक क्युमेक पाणी म्हणजे प्रतिसेकंद १,००० लिटर पाणी म्हणजेच १,००० क्युमेक या प्रमाणात पाणी सोडले जात असेल, तर १,००० x १,००० असे १० लाख लिटर पाणी प्रतिसेकंद या वेगाने नदीपात्रात सोडले जाते.
धरण पाणी आवक-जावक मापसर्वदूर चांगला पाऊस होतो तेव्हा धरणे भरत असतात. अशावेळी काही धरणांमधून पाणी सोडले जाते. इतके टीएमसह पाणी जमा झाले, तितके क्युसेक पाणी सोडले, असे आपल्या वाचण्यात येते. याचा नेमका अर्थ काय? एक टीएमसी (दशलक्ष घनफूट) म्हणजेच एक अब्ज इतके घनफूट किंवा २८,३१,६८,४६,५९२ लिटर पाणी. एक क्युसेक म्हणजे प्रतिसेकंद एक घनफूट म्हणजेच २८.३१७ लिटर प्रति सेकंद पाणी सोडले जाते.
एक क्युमेक म्हणजे एक घनमीटर प्रति सेकंद म्हणजेच एक हजार लिटर प्रति सेकंद पाणी नदीत सोडले जाते. एखाद्या धरणाची पाणी साठवण क्षमता १.९७ टीएमसी आहे, असे मानले, तर त्या धरणात १.९७ x २८.३१७ अब्ज लिटर पाणी मावते. याच धरणातून सध्या ५०० क्युसेक पाणी नदीत सोडत आहे, असे मानले, तर ५०० X २८.३१७ लिटर प्रतिसेकंद या विसर्गाने पाणी सोडले जात आहे.
धरणांचे दरवाजेधरणांमधून पाणी सोडण्यासाठी सरळ किंवा वक्र, अशा दोन प्रकारचे दरवाजे तयार केले जातात. पाण्याचा दाब अधिक असल्यास तो सहन करण्यासाठी वक्र गेट तयार केले जातात, तर पाण्याचा दाब कमी असल्यास त्या धरणाला सरळ गेट तयार केले जातात. सरळ गेटच्या तुलनेत वक्र गेट पाण्याचा अधिक दाब सहन करतात.
पांढरीरेषा : एखाद्या धरणातून ३०,००० क्युसेक वेगाने पाणी सोडले असता त्या नदीपात्राची पाणीपातळी जिथे पोहोचेल, ती रेषा व्हाइट लाइन अथवा पांढरी रेषा म्हणून ओळखली जाते. याला सर्वसामान्य पूर मानला जातो.निळीरेषा : २० ते २५ वर्षातून एखाद्या वेळेस नदीचे पात्र पांढरी रेषा ओलांडते. ज्यावेळी धरणातून ६०,००० क्युसेक वेगाने पाणी सोडले असता, त्या नदीपात्राची पाणीपातळी जिथे पोहोचेल ती रेषा ब्लू लाइन अथवा निळी रेषा म्हणून ओळखली जाते.लालरेषा : ४० ते ५० वर्षात अतिवृष्टीने नदीचे पात्र निळी रेषाही ओलांडते. ज्यावेळी धरणातून एक लाख क्युसेक वेगाने पाणी सोडले असता, त्या नदीपात्राची पाणीपातळी जिथे पोहोचेल ती रेषा रेड लाइन अथवा लाल रेषा म्हणून ओळखली जाते.