Maharashtra Rain : आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दि. १० जुलैपर्यंत नंदुरबार तसेच मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भातील १९ जिल्ह्यांत आणि जळगांव, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर अशा ६ जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता (Heavy rain) आहे.
या सहा जिल्ह्यातील शिरपूर, सिंदखेडा, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, एदलाबाद, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी, जुन्नर, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, महाबळेश्वर, जावळी, पाटण, शाहूवाडी, बावडा, राधानगरी, चांदगड व लगतच्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता जाणवते. त्यामुळे घाटावर उगम पावणाऱ्या महाराष्ट्रातील गोदावरी दारणा गिरणा वैतरणा कश्यपी कडवा प्रवरा,भीमा नीरा इंद्रायणी मुळा मुठा कुकडी कृष्णा-कोयना, पंचगंगा वारणा दूधगंगा भोगावती ह्या नद्या पूर-पाण्यासह दुथडी वाहु शकतात. संपूर्ण मराठवाड्यातील ८ आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा तसेच जळगांव धुळे नाशिक पुणे सातारा कोल्हापूर अशा ६ जिल्ह्यातील वर्षच्छायेच्या प्रदेशातील उर्वरित तालुक्यात आजपासुन पुढील तीन दिवस म्हणजे मंगळवार दि. ८ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
तर त्यापुढील २ दिवस म्हणजे बुधवार व गुरुवारी ९ व १० जुलै ला या भागात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. शुक्रवार दि. ११ जुलैपासुन काहीशी उघडीप, काहीशी रिमझिम, तर मधूनच सूर्यदर्शन अशा वातावरणाची शक्यता जाणवते.
- माणिकराव खुळेMeteorologist (Retd)IMD Pune.