विठ्ठल भिसे
मराठवाड्यातील अनेक भागांत गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या वैध-अवैध वाळू उपशामुळे नद्यांची अवस्था बिकट होत असताना, पाथरी तालुक्यातील कानसूर गावाने पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.(Godavari River Protection)
'नदी वाचली तरच गाव वाचेल' या ठाम भूमिकेतून ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून वाळू उत्खननाला पूर्णतः विरोध करत एक प्रभावी लोकचळवळ उभी केली आहे.(Godavari River Protection)
वाळू माफियांना गावकऱ्यांचा ठाम विरोध
तारूगव्हाण बंधाऱ्याच्या वरच्या बाजूस वसलेले, सुमारे चार हजार लोकसंख्या असलेले कानसूर गाव शेतीसमृद्ध म्हणून ओळखले जाते.
उस, कापूस आणि सोयाबीन ही प्रमुख पिके येथे घेतली जातात. मात्र या समृद्धीमागे केवळ शेतीच नव्हे, तर पर्यावरण जपण्याची जिद्दही तितकीच मजबूत आहे.
काही वर्षांपूर्वी शासनाने येथे वाळू उत्खननासाठी धक्का लिलावातून दिला होता. मात्र, ग्रामस्थांनी ठेकेदारांना नदीपात्रात प्रवेशच नाकारला.
वाहनांसह जबरदस्तीने उत्खनन करण्याचे प्रयत्न झाले, तरी गावकऱ्यांच्या एकजुटीपुढे ते निष्फळ ठरले.
वाढता विरोध पाहून प्रशासनालाही माघार घ्यावी लागली. 'एक टोपली वाळूसुद्धा उचलू देणार नाही' हा ग्रामस्थांचा निर्धार आजही कायम आहे.
नदीपात्र सुरक्षित; पाणीसाठा मुबलक
गावकऱ्यांच्या या भूमिकेचे सकारात्मक परिणाम आता स्पष्ट दिसू लागले आहेत. नदीपात्रातील नैसर्गिक वाळू टिकून राहिल्याने पाण्याचा साठा स्थिर आहे.
* भूजल पातळी कायम राहते
* विहिरींना वर्षभर पाणी उपलब्ध
* शेतीला सातत्याने पाण्याचा आधार
पावसाळ्यात पाणी साठवण्याची क्षमता वाढल्याने दुष्काळी परिस्थितीतही गाव तुलनेने सुरक्षित राहते. यामुळे कानसूरमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न जवळपास निर्माणच होत नाही.
तरुणांचा पुढाकार; सतत सजगता
या चळवळीत गावातील तरुणांचा मोठा सहभाग आहे. गोदावरी नदी परिसरात संशयास्पद हालचाल दिसताच ग्रामस्थ तात्काळ एकत्र येतात.
पर्यावरण संरक्षण ही सामूहिक जबाबदारी मानून प्रत्येकजण सतर्क असल्याने केवळ नदीच नव्हे, तर परिसरातील जैवविविधतेचेही संरक्षण होत आहे.
'कानसूर पॅटर्न' बनतोय मार्गदर्शक
कानसूरच्या या प्रयोगामुळे वाळू उत्खनन पूर्णपणे थांबले असून नदीपात्राची नैसर्गिक रचना अबाधित राहिली आहे. याचा थेट फायदा शेती, पाणी उपलब्धता आणि पर्यावरण संतुलनावर झाला आहे.
आज 'कानसूर पॅटर्न' हा इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत असून, अशीच एकजूट सर्व रेतीघाट परिसरातील गावांनी दाखवली, तर पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
'नदी जपली तरच जीवन जपले जाईल' या संदेशावर ठाम राहून कानसूर गावाने केवळ स्वतः ची नदी वाचवली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक दिशादर्शक मार्गही दाखवून दिला आहे.
Web Summary : Kansur village set an example by opposing sand mining and protecting the Godavari. Villagers united to prevent exploitation, ensuring water availability and agricultural prosperity. This 'Kansur Pattern' inspires other villages to conserve rivers.
Web Summary : कानसूर गाँव ने रेत खनन का विरोध करके और गोदावरी की रक्षा करके एक मिसाल कायम की। ग्रामीणों ने शोषण को रोकने, पानी की उपलब्धता और कृषि समृद्धि सुनिश्चित करने के लिए एकजुट होकर काम किया। यह 'कानसूर पैटर्न' अन्य गांवों को नदियों के संरक्षण के लिए प्रेरित करता है।