नाशिक : शहरासह जिल्ह्यांत गत दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पावसाची संततधार (Nashik Rain) सुरू असल्याने जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. त्यात त्र्यंबकेश्वर परिसरासह घोटी अणि इगतपुरीत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांपासून बरसणाऱ्या पावसामुळे तब्बल ७ धरणे शंभर भरली असून, १३ धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत जायकवाडीसाठी १८ टीएमसी पाणी गेल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते आहे. गंगापूर धरणात (Gangapur Dam) सध्या ५९.४८ टक्के पाणीसाठा असून, भाम, भावली, आळंदी, वालदेवी, भोजापूर, केळझर धरणे १०० टक्के भरली आहेत.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने दारणा, भावलीच्या पाणलोटातील घाटमाथ्यावरील धबधबे कोसळू लागले आहेत. त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. मागील २४ तासांत दारणात ८२५ दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. दारणा ६१.८८ टक्के भरले असून, यातून विसर्ग सुरू आहे.
या धरणातून अर्धा टीएमसीहून अधिक पाण्याचा विसर्ग दारणा नदीत केला जात आहे. दारणातील पाणी गोदावरीवरील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात सामावले जाते. गंगापूर धरणात ५०२ दलघफू नवीन पाण्याची आवक २४ तासांत झाली. अन्य धरणांतही कमी अधिक प्रमाणात पाणी दाखल होत असून, दारणा धरणाचे प्रमाण त्यातही सर्वाधिक आहे.
जिल्हाभरात पावसाची हजेरीगेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस जिल्ह्यात सर्वदूर पडत असल्याने शेतीसाठी तो चांगला समजला जातो आहे. घोटी आणि इगतपुरीत भातासाठी हा पाऊस उपयुक्त ठरेल तसेच धरण क्षेत्रात कोसळणाऱ्या या पावसामुळे वर्षभराची पाण्याची कमतरता भासणार नाही, असेही बोलले जाते आहे.