Dharashiv Dam Water : मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील प्रकल्प भरतील अशी आशा होती, मात्र, मृग व आर्द्रा कोरडे गेल्याने पाणीसाठा ४० टक्क्यांवरच स्थिर आहे. सीना-कोळेगाव ५०% वर, मांजरा मात्र २५% वरच आहे. (Dharashiv Dam Water)
खरीप हंगामावर चिंतेचे ढग दाटले आहेत. धाराशिव जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने पाठ फिरवली आहे. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. (Dharashiv Dam Water)
मात्र, त्यानंतर चाळीस दिवसांपासून पावसाचा खोळंबा सुरू असून, मृग आणि आर्द्रा नक्षत्रातही दमदार पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील २२२ प्रकल्पांमधील पाणीसाठा फक्त ४० टक्क्यांवर स्थिर आहे. आगामी काही दिवसांत पाऊस न झाल्यास पाणीसाठा कमी होण्याची शक्यता आहे.(Dharashiv Dam Water)
मे महिन्यात दिलासा; नंतर मात्र खंड
यंदा मे महिन्यात दमदार अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सर्व २२६ प्रकल्पांमध्ये २५ जूनपर्यंत ४० टक्के पाणीसाठा झाला. मात्र जून व जुलैमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे साठा वाढला नाही.
उलट, काही भागांत पिके उन्हामुळे करपत असून कमी प्रतीच्या जमिनींवरील पिकांची उंची खुंटली आहे. मे महिन्याच्या पावसामुळेच आज दुष्काळासारखी स्थिती टळली आहे.
सीना-कोळेगावमध्ये ५०%, मांजरा मात्र २५%
जिल्ह्यातील सर्वात मोठा सीना-कोळेगाव प्रकल्प यंदा मे महिन्यातच ५०% क्षमतेवर पोहोचला असून, त्यात सध्या ४५ दलघमी पाणी उपलब्ध आहे.
तर मांजरा प्रकल्पात केवळ २५% उपयुक्त पाणीसाठा असून, त्यात ४५.९ दलघमी पाणी शिल्लक आहे. जर जून-जुलैमध्ये पाऊस झाला असता तर मांजरा प्रकल्प भरून ओव्हरफ्लो झाला असता, असे पाटबंधारे विभागाने सांगितले.
जिल्ह्यातील प्रकल्पनिहाय साठ्याची स्थिती (१० जुलै २०२५ पर्यंत)
प्रकल्प प्रकार | १००% भरले | ७५% | ५०% | २५% | जोत्याखाली | कोरडे |
---|---|---|---|---|---|---|
मोठे (१) | ० | ० | १ | ० | ० | ० |
मध्यम (१७) | ० | १ | ४ | ६ | ० | ० |
लघु (२०८) | २१ | १९ | ३२ | ५० | ८२ | ४ |
एकूण (२२६) | २२ | २० | ३७ | ५६ | ८७ | ४ |
खरीप हंगाम धोक्यात?
पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार, पुढील काही दिवसांत पाऊस न झाल्यास केवळ पाणीसाठ्याचा ताणच वाढणार नाही, तर खरीप हंगामही धोक्यात येण्याची शक्यता आहे. सध्या मिळालेल्या साठ्यावरच शेतकऱ्यांची खरीप हंगामाची आशा टिकली आहे.
मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामाला दिलासा मिळाला. मात्र, मृग आणि आर्द्रा कोरडे गेल्यामुळे पुढील पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.