मधुकर सिरसट
बीड, लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांची तहान भागविणाऱ्या मांजरा धरणातीलपाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून बुधवारी (१४ ऑगस्ट) सकाळी ६ वाजेपर्यंत धरणात ११०.७१० दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. (Dam Water Storage)
त्यापैकी ६३.५८० दलघमी जिवंत पाणीसाठा असून धरणाची उपयुक्त पातळी ३५.९३ टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे केज, अंबाजोगाई, धारूर, कळंब, लातूर शहरासह ६१ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.(Dam Water Storage)
वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा
मांजरा धरणाची एकूण साठवण क्षमता २२४.०९३ दलघमी आहे. यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे कधी आवक वाढली तर कधी घट झाली. मे महिन्यातील पावसामुळे धरणात मोठा साठा झाला होता. मात्र, जून-जुलैमध्ये पाऊस कमी पडल्याने पाणी पातळीत घट झाली होती.
ऑगस्ट महिन्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने सध्या धरणात १५.८५ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे.सध्या जमा झालेला साठा साधारणतः वर्षभर पिण्यासाठी पुरेसा ठरणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे अभियंते सांगतात.
दरवर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी वाटपाचे धोरण ठरवले जाते, त्यानुसार साधारण ६० दलघमी पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवले जाते.
सिंचनासाठी आणखी पावसाची गरज
मांजरा धरणावर अवलंबून असलेल्या बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांतील ७३ गावांतील तब्बल २३ हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येते. सध्या पिण्याच्या पाण्यासाठी धरणात पुरेसा साठा झाला असला तरी शेतीसाठी आणखी पाण्याची गरज असल्याचे पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता नितनवरे यांनी सांगितले.
सध्याच्या पावसामुळे धरणाचा पाणीसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे ३ जिल्ह्यांतील नागरिकांना दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांच्या दृष्टीने मात्र अजूनही दमदार पावसाची गरज आहे.