आज मकर संक्रांतीपर्यन्त कमी झालेली थंडी व वाढलेल्या किमान तापमानाची श्रेणी -
थंडीच्या चढ-उतारानुसार, शनिवार दि. १० ते बुधवार दि. १४ जानेवारी(मकर संक्रांती) पर्यंतच्या गेल्या पाच दिवसात मध्य महाराष्ट्रातील पुणे अ.नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच छ. संभाजीनगर, परभणी अशा ८ जिल्ह्यात पहाटेच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ५ अंश से. ने तर मुंबईसह कोकणात २ ते ३ अंश से. ने वाढ होवून ५ दिवसात या जिल्ह्यात थंडी कमी झाली.
या एकूण (७+८)१५ àजिल्ह्यांत किमान तापमान १४ ते २० अंश से. दरम्यानच्या श्रेणीत वाढलेले राहिले. तर काल -परवा भागपरत्वे (सोमवार-ते बुधवार) दि. १२ ते १४ जानेवारीला ह्या जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहून दमटपणा टिकून राहिला.
विदर्भ व म. वाडा- थंडी टिकून राहिली.
विदर्भ-मराठवाड्यात मात्र नांदेड यवतमाळ वगळता उर्वरित १७ जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान जवळपास सरासरी इतके म्हणजे १२ ते १६ अंश से. दरम्यानचे राहून भले काहीशी कमी का होईना पण ह्या भागात थंडी टिकून राहिली. तर एकट्या यवतमाळ जिल्ह्यांत सरासरीच्या ५.९ अंश से किमान तापमान खालावून ते ८. ८ अंश से च्या दरम्यान राहून तेथे थंडीच्या लाटेचा प्रभाव जाणवत आहे..
आता थंडी वाढणार!
मकर-संक्रांती नंतर म्हणजे उद्या गुरुवार दि. १५ जानेवारी म्हणजे संक्रांतिच्या ' करि ' दिनापासून ते रविवार दि. १८ जानेवारी पौष (मौनी) आमावस्या पर्यंतच्या ४ दिवसात, पहाटे ५ च्या किमान तापमानात घसरण होवून, महाराष्ट्रात पुन्हा थंडीत काहीशी वाढ होण्याची शक्यता जाणवते.
दव (बादड)?
बं. उपसागरातून मध्य महाराष्ट्रात आलेल्या आर्द्रतेच्या अवशेषातून खान्देश, नाशिक, अ.नगर, बीड, नांदेड, परभणी, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ अशा १३ जिल्ह्यात, या चार दिवसात, थंडी बरोबर, एखाद्या-दुसऱ्या दिवशी पहाटे-सकाळी दव (बादड) पडण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.
ईशान्य मान्सून अजूनही जागेवरच!
दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू, आंध्र, कर्नाटक तसेच पोंडिचेरी काराईकल भागातून जानेवारी महिन्यात, होणारे ईशान्य मान्सूनचे निर्गमन आणि त्यानंतर उत्तर भारतात पुन्हा पाऊस व बर्फबारीचे आवर्तनातून महाराष्ट्राला चांगल्या थंडीचा लाभ होत असतो.
दोन वर्षांपूर्वी म्हणजे १४ जानेवारीला २०२४, संक्रांतीला तर मागील वर्षी २७ जानेवारीला तो बाहेर पडला होता. परंतु या वर्षी ईशान्य मान्सून अजूनही कार्यरतच आहे. त्यामुळे थंडी जरी जाणवत असली तरी आपण माफक थंडीचाच अनुभव आपण घेत आहोत.
- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.
