रूपेश उत्तरवार
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीपिकांचे वारंवार मोठे नुकसान होत असते. अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, वादळ अशा नैसर्गिक आपत्तींचा शेतकऱ्यांवर गंभीर परिणाम होतो. मात्र, नुकसानीची अचूक व वेळेत नोंद न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागते. (Automated Weather Station)
याशिवाय अनेकदा चुकीच्या व्यक्तींच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील तब्बल १२०१ गावांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Automated Weather Station)
हवामान केंद्रामुळे होणार फायदा
या केंद्रांच्या स्थापनेमुळे गावागावातील हवामानाची अचूक माहिती शासकीय यंत्रणेकडे उपलब्ध होणार आहे. पावसाचे प्रमाण, हवेचा वेग, तापमान, थंडीचा कडाका, गारपीट यामुळे झालेले नुकसान या केंद्रांच्या माध्यमातून सहज नोंदविता येणार आहे. परिणामी पारदर्शक सर्वेक्षण होऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
जबाबदारी स्थानिक अधिकाऱ्यांवर
या केंद्रांसाठी जागा निश्चित करण्याची जबाबदारी तलाठी, ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. प्रत्येक गावात केंद्र कुठे उभारायचे यासाठी पाहणी सुरू झाली आहे.
सॅटेलाईटशी जोडलेली यंत्रणा
ही प्रणाली विंडस सॅटेलाईट तंत्रज्ञानावर आधारित असून गावखेड्यांच्या भौगोलिक स्थितीचा अचूक अहवाल मिळेल. अतिवृष्टी, वादळ किंवा गारपिटीमुळे किती क्षेत्राला फटका बसला याची माहिती काही क्षणांत प्रशासनाकडे पोहोचेल.
आधीची मर्यादा, आता व्यापक माहिती
पूर्वी केवळ मंडळ पातळीवर अतिवृष्टीची नोंद घेतली जात होती. त्यामुळे अनेक गावांची परिस्थिती दुर्लक्षित राहायची. मात्र या नवीन यंत्रणेच्या मदतीने गावागावातील प्रत्यक्ष पावसाचे प्रमाण, उन्हाचा प्रकोप, थंडीची तीव्रता अशा हवामानातील बदलांचा अचूक अहवाल मिळणार आहे.
शेतकऱ्यांचा दिलासा
या आधुनिक हवामान केंद्रांमुळे शेतपिकांच्या नुकसानीची खरी नोंद होणार असून, शेतकऱ्यांना योग्य वेळी शासनाकडून मदत मिळणे सुलभ होणार आहे. पारदर्शकता वाढेल आणि अन्यायकारक नुकसानभरपाई टळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हवामानातील बदल कळणार
उन्हाच्या प्रकोपाने पिकांवर कुठला परिणाम झाला याची माहिती प्रत्येक गावांमधून मिळण्यास मदत होईल. याशिवाय थंडीचा प्रकोप वाढल्यास गावपातळीवर किती तापमान होते याची माहितीदेखील मिळण्यास मदत होणार आहे. यातून शेतीपिकांचे झालेले नुकसान नोंदविले जाईल.