Join us

कोयना धरणाचे पाणी जलवाहिन्यांद्वारे मुंबईला नेणार; काय आहे हा प्रकल्प? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 12:10 IST

Koyna Dam कोयना धरणातील वीजनिर्मितीनंतर वाशिष्ठी नदीमार्गे अरबी समुद्रात सोडले जाणारे ६७ टीएमसी अवजल मुंबईकडे वळविण्याचा प्रस्ताव आहे. त्यादृष्टीने आता पाटबंधारे विभागाकडून चाचपणी सुरू झाली आहे.

कोयना धरणातील वीजनिर्मितीनंतर वाशिष्ठी नदीमार्गे अरबी समुद्रात सोडले जाणारे ६७ टीएमसी अवजल मुंबईकडे वळविण्याचा प्रस्ताव आहे. त्यादृष्टीने आता पाटबंधारे विभागाकडून चाचपणी सुरू झाली आहे.

पाणी वापराकरिता पूर्व व्यवहार्यता अहवाल तयार करण्याकरिता कळंबस्ते येथे नुकतीच वाशिष्ठी नदीकिनारी दिल्ली येथील संस्थेकडून मृदा परीक्षण व भूगर्भ चाचणी घेण्यात आली.

कोयना धरणाच्यावर पाण्यावर वीज तयार केल्यानंतर हे पाणी कोळकेवाडी धरणातून वाशिष्ठी नदीमार्गे समुद्राला जाते.

हे पाणी सुमारे १६० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंबईला जलवाहिन्यांद्वारे नेण्यावर नियोजन केले जात आहे. त्यासाठी ३८ कोटी रुपये खर्चुन व्हॅसकॉम कंपनीमार्फत हवाई सर्वेक्षण करण्यात आले.

या अवजलाचा वापर करण्याबाबतची व्यवहार्यता अहवाल तयार करण्याकरिता केंद्र शासन अंगीकृत नवी दिल्ली येथील वाप्कोस लिमिटेड व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आलेला आहे.

ही कंपनी सध्या नदीकिनारी कळंबस्ते येथे विविध प्रकारचे सर्वेक्षण करीत आहे. यासंदर्भात कोलाड पाटबंधारे विभाग कार्यालयाने कळंबस्ते ग्रामपंचायतीला पत्र पाठवत याबाबतची माहिती दिल्याचे सरपंच विकास गमरे यांनी सांगितले.

अहवाल तयार करण्यासाठी ग्रामपंचायतीमधील स्मशानभूमीजवळील जागेत मृदा सर्वेक्षण करण्याबरोबरच हवाई सर्वेक्षण, भूगर्भ चाचणी, मृदा नमुना घेऊन मृदा परीक्षण केले जाणार आहे.

दिल्लीतील कंपनीच्या येथे आलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या नदीवर बंधारा प्रस्तावित आहे. येथे मोठी जॅकवेल बांधून तेथून पाणी उचलले जाणार असल्याचे प्राथमिक नियोजन आहे. त्यादृष्टीने या परिसरात विविध चाचण्या घेतल्या गेल्या.

शक्यतो कोकण रेल्वे मार्गाच्या बाजूने जलवाहिनी नेण्याचा विचार आहे. सर्वेक्षण सुरू केल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला. यामुळे काम अर्धवट सोडून कंपनीचे कर्मचारी निघून गेले आहेत.

अधिक वाचा: ८४ लाख रुपये खर्चुन ब्रिटिशांनी बांधलेल्या ह्या धरणाला पूर्ण होणार १०० वर्ष; जाणून घ्या इतिहास

टॅग्स :कोयना धरणधरणपाणीमुंबईनदीपाटबंधारे प्रकल्पसरकारदिल्लीराज्य सरकार