Join us

तीन वर्षांत पहिल्यांदाच जायकवाडीचे आपत्कालीन दरवाजे उघडले; २७ दरवाजांतून १.१३ लाख क्सुसेक विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 09:28 IST

Jayakwadi Dam : जायकवाडी धरण परिसरात झालेल्या पावसामुळे गेल्या तीन वर्षात प्रथमच आपत्कालीन दरवाजे उघडण्याची वेळ आली असून तब्बल १ लाख १३ हजार १८४ क्युसेक विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदामाई दुथडी भरून वाहत होती.

जायकवाडी धरण परिसरात शनिवारी दुपारनंतर झालेल्या पावसामुळे पैठणच्या नाथसागरात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली. त्यामुळे रविवारी पहाटे अडीच वाजता जायकवाडीच्या आपत्कालीन नऊ दरवाजांसह सर्व २७ दरवाजे चार फुटांनी उघडण्यात आले होते. गेल्या तीन वर्षात प्रथमच आपत्कालीन दरवाजे उघडण्याची वेळ आली असून तब्बल १ लाख १३ हजार १८४ क्युसेक विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदामाई दुथडी भरून वाहत होती.

शनिवारी दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात ८२ हजार ९४० क्युसेक आवक होत होती. त्यामुळे प्रशासनाने रात्री अडीच वाजता धरणाचे आपत्कालीन नऊ दरवाजे उघडण्यात आले होते. दुपारी बारा वाजता धरण परिसराची कार्यकारी अभियंता प्रशात संत, तहसीलदार ज्योती पवार, उपविभागीय अभियंता श्रद्धा निंबाळकर, सोमनाथ परदेशी, नामदेव खराद, भूषण कावसानकर, सपोनि सांगळे जनाबाई, किरण जाधव यांनी पाहणी केली.

दुपारनंतर आपत्कालीन दरवाजे बंद

रविवारी नाथसागरात आवक कमी होऊन ३९ हजार ७९९ क्सुसेकवर आली. त्यामुळे दुपारी बारा वाजता जायकवाडीचे आपत्कालीन नऊ दरवाजे बंद करण्यात आले. १८ दरवाजांतून ४७ हजार १६० क्सुसेक विसर्ग करण्यात येत आहे. धरणात जिवंत पाणीसाठा २१३७.०५ दलघमी आहे.

१५ हजार पर्यटक

सर्व दरवाजांतून पाणी सोडल्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. रविवारची सुटी असल्याने हे दृश्य पाहण्यासाठी दिवसभरात सुमारे पंधरा हजार पर्यटकांनी गर्दी केली होती.

घाटासह दोन पूल पाण्याखाली

रविवारी पहाटे सर्व २७ दरवाजांतून १ लाख १३ हजार १८४ क्सुसेक विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नाथ मंदिर घाट परिसरातील दशक्रिया विधी हॉलमध्ये पाणी शिरले, तसेच पैठण-कावसान आणि आपेगाव-कुरण पिंपरी पूल पाण्याखाली गेला होता.

हेही वाचा : प्राण्यांच्या संपर्कातून पसरणारा जीवघेणा आजार; जाणून घ्या ब्रुसेलोसिसची लक्षणं, कारणं आणि उपचार

टॅग्स :जायकवाडी धरणपाणीधरणनदीशेती क्षेत्रमराठवाडागोदावरी