Join us

Manganga River Overflow : माण तालुक्यात धुवाधार पाऊस माणगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 15:17 IST

Manganga River Overflow : माण तालुक्याच्या पश्चिम भागात बुधवारी पहाटे जोरदार पाऊस झाल्याने माणगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्याचबरोबर पश्चिम भागातील अनेक पूल पाण्याखाली गेल्याने काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.

दहिवडी : माण तालुक्याच्या पश्चिम भागात बुधवारी पहाटे जोरदार पाऊस झाल्याने माणगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्याचबरोबर पश्चिम भागातील अनेक पूल पाण्याखाली गेल्याने काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.

माण तालुक्यातील पश्चिम भागात बुधवारी पहाटे कासरवाडी, सत्रेवाडी, मलवडी, शिरवली, शिंदे खुर्द, भांडवली, गाडेवाडी या परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे माणगंगा नदीला मोठा पूर आला होता.

दहिवडीवरून जाणारा रस्ता शिंदी खुर्द येथील पूल पाण्याखाली गेला होता. सत्रेवाडीवरून मलवडीकडे येणारा रस्ता पाण्याखाली गेला होता. त्याचबरोबर मलवडी, आंधळी आणि आंधळी गावातून दहिवडीकडे जाणारा रस्ता हे मानगंगा नदीवरील दोन्ही पूल पाण्याखाली गेले होते.

बिदाल-पांगरी रस्त्यावरील मानगंगा नदीवरील पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे सकाळी अनेक ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांना अडचण निर्माण झाली होती.

त्याचबरोबर परीक्षा असल्याने अनेकांना वेळेत जाता आले नाही. या पावसामुळे कांद्याच्या तरव्याचे मोठे नुकसान झाले आणि अनेक ठिकाणी शेतीला वापसा नसल्याने यामध्ये आणखीनच भर पडली. त्यामुळे हा हंगाम उशिरा सुरू होणार आहे.

पावसाने रस्त्यांची दयनीय अवस्थामाणगंगा नदीवरील मलवडी रोड ते चिरमे वस्तीवर जाणारा माणगंगा नदीवरील पूल वाहून गेल्याची घटना घडली. यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. दुपारनंतर पूरस्थिती ओसरल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. मात्र, या पावसाने रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.

टॅग्स :पाऊसतालुकाहवामानदुष्काळकांदापीकशेती