सांगली: निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होते, शेतकऱ्यांना हवामानाची माहिती मिळत नाही. कमी-अधिक तापमान, पाऊस यांची माहिती योग्य राहत नाही.
यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने जिल्ह्यातील ६९६ गावांमध्ये स्वयंचलित 'वेदर स्टेशन' उभारण्याचा निर्णय घेतला आहे. जागा निश्चित झाली असून, महिन्याभरात हवामान यंत्रे बसविण्यात येणार आहेत.
नैसर्गिक आपत्तीमुळे नेहमीच शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. झालेल्या नुकसानाच्या नोंदी तत्काळ उपलब्ध होत नाहीत. नुकसानीचे पंचनामे वेळेत न झाल्याने शासनाकडून शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळत नाही.
या सर्व प्रकारावर स्वयंचलित हवामान केंद्रांमुळे मात करता येणार आहे. अद्ययावत हवामान केंद्रामुळे जागा निश्चितीची जबाबदारी तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवकांकडे सोपविण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायतींपैकी ६१६ ग्रामपंचायतींमध्ये जागा निश्चित केली आहे.
८० ग्रामपंचायतींच्या ठिकाणी शासकीय जागा मिळाली नसल्यामुळे खासगी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया चालू आहे. स्वयंचलित 'वेदर स्टेशन'मुळे गावागावांतील नुकसानाचा खरा अहवाल शासकीय यंत्रणेपुढे पुढे येण्यास मदत होणार आहे.
गावामध्ये प्रत्येक दिवशी हवेचा वेग किती होता, याशिवाय थंडीचा कडाका किती राहिला, याची माहिती केंद्रात नोंद होईल. शिवाय पावसाच्या नोंदीची माहिती उपलब्ध होणार आहे.
विंडस प्रणाली गावात काम करणार◼️ सॅटेलाईटच्या माध्यमातून ही केंद्र काम करीत असल्याने त्या भागातील भौगोलिक परिस्थितीचा अहवाल मिळेल.◼️ अधिक अथवा कमी पावसाने पिकांच्या नुकसानाची व अन्य कारणांनी होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानाची माहिती उपलब्ध होईल.
प्रशासनास अतिवृष्टीची अचूक माहिती मिळणारजिल्ह्यातील फक्त मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद घेतली जाते. अनेकवेळा इतर गार्वामध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला तर त्याची नोंद होत नाही. या अद्ययावत 'वेदर स्टेशन' प्रणालीमुळे अतिवृष्टी झालेल्या गावांची यादीच समोर येईल.
'वेदर स्टेशन'ची वैशिष्ट्ये◼️ २४ तास हवामान निरीक्षण.◼️ इंटरनेट/मोबाइल अॅपद्वारे डेटा उपलब्ध.◼️ यंत्रे स्वयंचलित: मानवी हस्तक्षेप नाही पीक सल्ला, हवामानानुसार अलर्ट मिळणार.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत अहवामानाचा अंदाज मिळावा, यासाठीच ६९६ ग्रामपंचायतींच्या ठिकाणी स्वयंचलित 'वेदर स्टेशन' बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया चालू आहे. जागा निश्चित झाली असून, लवकरच केंद्र शासनाकडून 'वेदर स्टेशन' बसविण्याची प्रक्रिया चालू होईल. - विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
अधिक वाचा: अखेर 'एफआरपी'चा निर्णय झाला; आता त्याच वर्षाचा साखर उतारा धरून शेतकऱ्यांना पेमेंट होणार