पावसाळ्याचे सव्वादोन महिने उलटले आहेत. या कालावधीत मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत आज सरासरी ८० टक्के पाणीसाठा आहे. असे असले, तरी अपेक्षित मुसळधार पाऊस न पडल्याने विभागातील मध्यम आणि लघु प्रकल्पांत केवळ ४० टक्केच जलसाठा जमा झालेला आहे.
गत दोन वर्षाच्या तुलनेत आजचा जलसाठा पाच पट आहे. मराठवाड्यात जायकवाडीसह ११ मोठे प्रकल्प आहेत. माजलगाव वगळता उर्वरित सर्वच प्रकल्पांत सरासरी ८० टक्के जलसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. मोठ्या प्रकल्पांत पुरेसा जलसाठा असला तरी मध्यम आणि लघु प्रकल्पांत मात्र अत्यल्प पाणी आहे. या प्रकल्पांवरच गावखेड्यांची तहान भागविण्यात येते. तसेच पशू, पक्ष्यांच्या चाऱ्या, पाण्याची सोय होत असते. यामुळे लघु आणि मध्यम प्रकल्प
भरावी, अशी शेतकऱ्यांसह प्रशासनाची अपेक्षा आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९८ लघु प्रकल्पांत सरासरी ६१ टक्के पाणी आहे. गतवर्षी या प्रकल्पांमध्ये केवळ ९ टक्के जलसाठा होता. तर २०२३ मध्ये ८ टक्के पाणीसाठा होता. जालना जिल्ह्यात ५७लघु पाटबंधारे धरणांत ३४ टक्के पाणीसाठा आहे.
मागील सलग दोन वर्षी या प्रकल्पांमध्ये केवळ २ टक्केच पाणी होते. बीड मधील १२६ प्रकल्पांत ३९ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी या जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत २१ टक्के, तर २०२३ मध्ये ८ टक्के जलसाठा होता.
लातूर जिल्ह्यातील १३५ लघु प्रकल्पांत २७ टक्के, तर धाराशिव जिल्ह्यातील २०६ धरणांत ४५ टक्के पाणीसाठा आहे. नांदेड जिल्ह्यातील ८० धरणांत ४८ टक्के जलसाठा आहे. परभणी जिल्ह्यातील २२ प्रकल्पांत २६ टक्के आणि हिंगोली जिल्ह्यातील २७प्रकल्पांत केवळ १६ टक्केच पाणी असल्याची माहिती आहे.
४३% पाणी मध्यम धरणांत
जालन्यातील ७प्रकल्पांत २६ टक्के जलसाठा जमा आहे. बीड जिल्ह्यातील १६ धरणांत ६१ टक्के आणि लातूर जिल्ह्यातील ८ धरणांत १९ टक्के आणि धाराशिवमधील १७प्रकल्पांत ५५ टक्के पाणी आहे. नांदेड जिल्ह्यात ९ मध्यम प्रकारची धरणे आहेत. यात आज ४५ टक्के पाणी जमा आहे. परभणी जिल्ह्यातील २ प्रकल्पांत ५४ टक्के जलसाठा आहे.
तीन दिवसांपासून पावसाची हजेरी
मराठवाड्यात ७ ऑगस्टपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. ८ ऑगस्ट रोजी तीन जिल्ह्यांतील १६ मंडळांत अतिवृष्टी झाली. दि. ९ व १० ऑगस्ट रोजी विभागातील सर्व जिल्ह्यांत कमी-अधिक पाऊस झाला. दि. १० ऑगस्ट रोजी सकाळपर्यंत विभागात ४.६ मि.मी. पावसाची नोंद झाली. वार्षिक सरासरीच्या तुलनेत मराठवाड्यात सध्या ४८ टक्के पाऊस झाला आहे.
रविवारी सकाळपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६ मि.मी., जालना जिल्ह्यात ६.१ मि.मी., बीड जिल्ह्यात ७.८ मि.मी., लातूर १ मि.मी., धाराशिव ६.४ मि.मी., नांदेड २.७ मि.मी., परभणी १.६ मि.मी., हिंगोली ३.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरी ६७९.५ मि.मी. आहे. आतापर्यंत ३२६.८ मि.मी. पाऊस झाला आहे.
हेही वाचा : उच्च शिक्षित दोन भावंडांनी केळीतून कमावले २८ लाख; बारूळच्या केळीचा परराज्यात गोडवा