तिसगाव : सोमवारी दुपारी साडेचारनंतर तिसगाव (ता. पाथर्डी) येथे तीस मिनिटे गारपिटीसह पाऊस बरसला. यावेळी तिसगाव वेशीजवळ दोन विटेच्या आकाराच्या गारा पडल्या.
तिसगाव परिसरातील श्रीक्षेत्र हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव, जवखेडे, चितळी, पाडळी परिसरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तिसगाव शहरात मोठ्या प्रमाणावर गारा पडल्या.
करुणेश्वर मंदिराजवळील ऐतिहासिक वेशीजवळ विटेच्या आकाराच्या दोन गारांचे गोळे महामार्गावर पडले. सुदैवाने यावेळी वाहतूक विरळ असल्याने अनुचित प्रकार घडला नाही.
यावेळी जवळील दुकानात असलेल्या घनश्याम महाराज शिंदे यांनी हे गारांचे गोळे उचलून नेले. ते पाहण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली.
पंचक्रोशीतील गाव परिसरात अनेक कांदा उत्पादकांचे कांदे ढीग शेतातच भिजले. ट्रॅक्टरने कांदा वाहतूक करीत असतानाही काहींचे कांदे भिजले.
सायंकाळी उशिरापर्यंत कांदे झाकण्यासाठी प्लास्टिक पेपर व गोण्यांचे तळवट नेण्यासाठी शेतकऱ्यांची तिसगाव बाजारपेठेत वर्दळ सुरू होती.
डाळिंब बहरांचीही मोठी हानी झाली आहे. पाऊस अल्पसा, वादळ जास्तीचे त्यामुळे शेती उत्पादित माल, आंब्याच्या कैऱ्या यांनाही हानी पोहोचली.
अधिक वाचा: राज्यात जलसंधारण महामंडळाकडून केली जाणारी ही कामे होणार रद्द; मुख्यमंत्र्यांचे आदेश