Join us

गिरणा धरण 95 टक्क्यांपर्यंत भरले, जळगावकरांची दोन वर्षांची पाण्याची चिंता मिटली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 14:35 IST

Girna Dam : दमदार पावसामुळे (heavy Rain) जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे (heavy Rain) जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गिरणा धरण ४ सप्टेंबरपर्यंत ९५ टक्क्यांपर्यंत भरले असून, येत्या काही दिवसात १०० टक्क्यांपर्यंत भरणार आहे.

तर दुसरीकडे जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाचाही जलसाठा ८६ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे जळगावकरांची दोन वर्षांसाठी पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

गिरणा धरणात २५०० क्युसेकपर्यंत पाण्याची आवक सुरू असल्याने, गुरुवारी दुपारी दोन वाजता धरणातून ८१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीत सोडण्यात आला आहे. यामुळे गिरणा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, धरणातील जलसाठा ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, १५ सप्टेंबरपर्यंत हा जलसाठा ठेवणे आवश्यक असल्याने, धरणातून आता १५ पर्यंत विसर्ग कायम राहण्याची शक्यता आहे.

पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची समस्या मिटणार?जिल्ह्यातील लहान-मोठ्या प्रकल्पांमधील एकूण जलसाठा ७१ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगामात सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. गिरणा धरणातून यंदाही गेल्या वर्षाप्रमाणे ५ आवर्तने मिळण्याची शक्यता आहे.

वाघूर धरणातील जलसाठाही शंभरीकडे असल्याने जळगाव शहरासह जामनेर शहराचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे मिटला आहे. यासह ७ मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे या धरणांच्या सिंचनाखाली येणाऱ्या ८० टक्के क्षेत्राचा सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे.

गिरणा धरणात जर आवक वाढत राहिली तर टप्प्याटप्प्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. हतनूर धरणाचेही १८ दरवाजे उघडल्याने तापी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे तापी नदीलाही पूर आला आहे.

टॅग्स :पाऊसहवामान अंदाजधरणमहाराष्ट्रगिरणा नदी