Join us

मृगाचा कोल्हा, चित्राची म्हैस; शेतकऱ्यांना यंदा पावसाळ्यात कोणते नक्षत्र तारणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 08:28 IST

मशागत अंतिम टप्प्यात, घरच्या बियाणांवर राहणार शेतकऱ्यांचा भर

मोहन राऊत

मोबाइल अॅपपर्यंत प्रगती झाली असली तरी मृगाचा अंदाज काढण्यासाठी शेतकरी पंचांगच काढतात. याच अंदाजावर शेतकरी नेहमी विश्वास ठेवून आपल्या शेतीची पेरणी करतो. खरीप हंगामात त्या-त्या नक्षत्राचे वाहन शेतकऱ्यांच्या जीवनाचे सुख-दुःखाचे चक्र सुरू ठेवते, असा समज आहे.

यंदा मृग नक्षत्र कोल्हा या वाहनापासून तर, चित्राच्या म्हैस या वाहनापर्यंत समाधानकारक पावसाचा अंदाज पंचांगकर्त्यांनी व्यक्त केल्याने शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्नाची आशा पल्लवित झाली आहे

मागील चार वर्षांमध्ये अनेकदा पावसाने खरीप हंगामात दगा दिला. कोणत्या नक्षत्रात किती पाऊस पडणार, याविषयी पंचांगकर्त्यांनी मांडलेले अंदाज उधळले. परिणामी पेरणी व मशागतीची वाताहत झाली तर, कधी अल्प पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले. मागील वर्षी जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाला, तर, सोयाबीन पीक घरात येत असताना झालेल्या अधिक पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले.

यंदा खरीप हंगामात समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत पूर्ण केली आहे.

पावसाची नक्षत्रे

दिनांकनक्षत्रेवाहन
७ जूनमृगकोल्हा
२१ जूनआर्दामोर
५ जुलैपुनर्वसूहत्ती
१९ जुलैपुष्यबेडूक
२ ऑगस्टअश्लेषागाढव
१६ ऑगस्टमघाकोल्हा
३० ऑगस्टपूर्वाउंदीर
१३ सप्टेंबरउत्तराहत्ती
२६ सप्टेंबरहस्तमोर
१० ऑक्टोबरचित्राम्हैस

४० टक्के शेतकरी सावकाराच्या दारी

गतवर्षी सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झाल्यामुळे भरपाई म्हणून शासनाने या शेतकऱ्यांना मदत दिली. परंतु, या मदतीचा धनादेश बँकेतील खात्यात जमा होताच कर्ज कपात करण्यात आली. त्यामुळे या खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यातील ४० टक्के शेतकऱ्यांनी आतापासूनच सावकाराचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली आहे.

हेही वाचा - कापूस लागवड करतांना या गोष्टींची ठेवा जाण; उत्पन्नाची वाढेल हमी पिकांची असेल शान

टॅग्स :हवामानपाऊसखरीपशेतकरीशेतीपीक व्यवस्थापन