Join us

मागील तीन वर्षापासून निम्न दूधना प्रकल्पात ठेवला जातोय ७५ टक्के जलसाठा; वाचा काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 16:54 IST

Nimna Dudhna Water Update : निम्न दुधना प्रकल्पाची पाणीपातळी ७५ टक्क्यांपर्यंत कायम ठेवण्यासाठी ऑगस्ट महिन्यात अतिरिक्त आलेले पाणी दुधना नदी पात्रात सोडण्यात आले आहे. एकाच महिन्यात १४५.७२२ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, साठवण क्षमतेच्या ४५ टक्के पाणी नदीपात्रात सोडावे लागले आहे.

निम्न दुधना प्रकल्पाची पाणीपातळी ७५ टक्क्यांपर्यंत कायम ठेवण्यासाठी ऑगस्ट महिन्यात अतिरिक्त आलेले पाणी दुधना नदी पात्रात सोडण्यात आले आहे. एकाच महिन्यात १४५.७२२ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, साठवण क्षमतेच्या ४५ टक्के पाणी नदीपात्रात सोडावे लागले आहे.

निम्न दुधना प्रकल्पात १०० टक्के जलसाठा केल्यानंतर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेलेले असंपादित जमिनीवर पाणी साचून पिकाचे नुकसान होत आहे. त्यामुळे मंठा व परतूर तालुक्यांतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दुधना प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी साठा करू नये, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे मागील तीन वर्षापासून प्रकल्पात केवळ ७५ टक्के जलसाठा ठेवला जात आहे.

प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या असंपादित जमिनीची संबंधित विभागाकडून मोजणीची प्रक्रिया केली जात असून, मोजणी अंतिम टप्प्यात आहे. अद्यापही तीन ते चार गावांतील मोजणी अपूर्ण असल्यामुळे पुढील प्रक्रिया थांबली आहे. परिणामी यावर्षीदेखील प्रकल्पात ७५ टक्के पाणीसाठा ठेवल्या जात आहे.

मे महिन्यातच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर प्रकल्पात पाण्याची आवक सुरू झाली होती. जून महिन्यात जेमतेम पाऊस पडला, तर जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. परंतु, ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस झाल्याने निम्न दुधना प्रकल्पाची पाणीपातळी झपाट्याने वाढली होती.

पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता

• काही दिवसांतच प्रकल्प ७५ टक्क्यांवर पोहोचल्यामुळे दि. १८ ऑगस्ट रोजी प्रकल्पाचे आठ दरवाजे उघडून नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.

• दुधना प्रकल्पाची साठवण क्षमता ३४४ दलघमी एवढी आहे. ऑगस्ट महिन्यात प्रकल्पातून १५६.७२२ दलघमी पाणी सोडण्यात आले जे, की साठवण क्षमतेच्या ४५ टक्के आहे.

• गतवर्षीही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे प्रकल्पातून सर्वाधिक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला होता.

• यावर्षीदेखील अशीच परिस्थिती निर्माण होत आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस आल्यानंतर प्रकल्पाचे दरवाजे उघडून आणखी पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे.

रब्बी हंगामाला मिळणार पाणी

निम्न दुधना प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा असल्यामुळे आगामी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्यारी आदी पिकांना दोन्ही कालव्यांत पाणी सोडून सिंचनाची सोय केली जाणार आहे. रब्बी हंगामात तीन, तर उन्हाळी हंगामाला दोन आवर्तने देण्यासाठी अडचण भासणार नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र

टॅग्स :पाणीमराठवाडाधरणनदीगोदावरीशेती क्षेत्र