lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > विश्लेषण: दुबईतील ढगफुटीचा भारतीय शेती व कृषी अर्थव्यवस्थेवर परिणाम काय?

विश्लेषण: दुबईतील ढगफुटीचा भारतीय शेती व कृषी अर्थव्यवस्थेवर परिणाम काय?

dubai flash flood & cloud burst and effect on Indian farming and economy | विश्लेषण: दुबईतील ढगफुटीचा भारतीय शेती व कृषी अर्थव्यवस्थेवर परिणाम काय?

विश्लेषण: दुबईतील ढगफुटीचा भारतीय शेती व कृषी अर्थव्यवस्थेवर परिणाम काय?

दुबईत ढगफुटी झाली. त्यातून भारतासारख्या देशाने वेळीच बोध घेण्याची आवश्यकता आहे. ज्या कारणाने दुबईत ढगफुटी झाली, भविष्यात त्याच कारणास्तव भारतातील शेती व अर्थव्यवस्था अडचणीत येऊ शकते.

दुबईत ढगफुटी झाली. त्यातून भारतासारख्या देशाने वेळीच बोध घेण्याची आवश्यकता आहे. ज्या कारणाने दुबईत ढगफुटी झाली, भविष्यात त्याच कारणास्तव भारतातील शेती व अर्थव्यवस्था अडचणीत येऊ शकते.

शेअर :

Join us
Join usNext

उष्णता व दुष्काळाने भारत होरपळत असतांनाच ओमान आणि संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये ढगफुटी (फ्लॅशफ्लड) मुळे १९ पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले आहेत.  विशेष म्हणजे ३ ऑक्टोबर २०१० साली पुण्यात ९० मिनिटात १८२ मिलीमीटर पाऊस होत ढगफुटी झाली होती व या ढगफुटीची आगाऊ सुचना दुपारी अडीच वाजता देऊनही चार लोक पुण्यात मृत्युमुखी पडले होते. त्यामानाने सर्व सुबत्ता असतांनाही दुबईत फार मोठे नुकसान झाले आहे. बहरीन, ओमान, कतार आणि सौदी अरेबियामध्ये सोमवारी रात्री पावसाला थोडी सुरुवात झाली होती. 

यूएईत सोमवारी मध्यरात्रीपासून २० मिमी पाऊस पडला. मात्र, मंगळवारी सकाळी ९ वाजेपासून वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीला सुरुवात झाली. दुबईत मंगळवारी (१६ एप्रिल २०२४) संध्याकाळी ढगफुटी होत दीड वर्षात होणारा म्हणजे १४२ मिमीपेक्षा जास्त पाऊस अवघ्या काही मिनिटात कोसळला. या ठिकाणी २४ तासांत १० इंचापेक्षा जास्त (२५४ मि.मी पेक्षा जास्त) पाऊस कोसळला.

सरकार म्हणते 'दुर्मिळ ढगफुटी'!
युएई सरकारी मीडिया ऑफिसने त्याच्या अधिकृत एक्स खात्यावर पोस्ट करीत या ढगफुटीचे वर्णन ‘अपवादात्मक व दुर्मिळ हवामान घटना’ असा केला असून अधिक पावसाचा अलर्ट जारी करीत नागरीकांना स्वत:च स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले गेलेआहे. 

..म्हणून झाली ढगफुटी!
दुबई व इतर‌ आखाती देशात ढगफुटी होण्यामागे १६ एप्रिल २०२४ रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी झालेल्या सुर्यावर उठलेल्या एम १.१ तसेच भारतीय वेळेनुसार पहाटे ४ वाजून एक मिनिटांनी झालेल्या केपी ५ (जी१) या चुंबकीय वादळांआधी व नंतर पृथ्वीच्या कवचकुंडलांना म्हणजे मॅग्नेटोस्फियरला भेदत आलेल्या सौरप्रारणांचा भौतिक व रासायनिक प्रक्रियेवरील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम होय. यामुळे क्युमोलोनिंबस ढगांची निर्मिती होत विजांच्या कडकडाट व गडगडासह दुबई व इतर आखाती प्रदेशात ढगफुटी होत मोठी जिवित व वित्तहानी झाली.

कृत्रिम पावसाचा प्रयोग भोवला?
दुष्काळावर मात करण्यासाठी दुबई व‌ आखाती देशांना कृत्रिम पावसाचा प्रयोग भोवला का याबाबत सध्या जगभर चर्चा सुरू आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रीय हवामान केंद्राने जास्तीत जास्त पाऊसाच्या अपेक्षेने सीडिंग विमानांनी २ दिवसांत ७ वेळा उड्डाण केली असल्याचे मान्य केले आहे. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष हटवित, मर्यादित भूजल पातळी वाढवण्यासाठी दुबईत कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयोग होतात. यासाठी छोटे विमान तैनात केल्यानंतर पावसाला सुरुवात झाली, अशी चर्चा आहे. बहरीन, ओमान व कतार या देशांनाही ढगफुटींचा फटका बसला आहे. 

पाऊस नाही म्हणून चीन प्रमाणेच युएईमध्ये झालेल्या 'क्लाउड सीडिंग'ने कृत्रिम पावसाच्या प्रयोगामुळे असे घडले असे सांगितले जात आहे. मात्र कृत्रिम पावसाच्या प्रयोगाच्या योगदानाबरोबरच अचानक आलेल्या लॉंग वेव रेडीएशनचा परिणाम जास्त असून सोलर सायकल २५ चा उच्चांक गाठताना निर्माण होणाऱ्या 'टेंपरेचर इडीज' म्हणजे तापमान भोवऱ्यांचा हा परिणाम आहे.

पुणे येथील वृक्षवल्लीने आच्छादित कोरेगाव पार्क मधील तापमान अचानक ४२ अंश सेल्सियसच्या पलिकडे पोहचणे, उष्माघाताचे वाढते रुग्ण, कुत्र्यांचे व बिबट्यांचे वाढते हल्ले तसेच विजांच्या कडकडासह होत असलेला सध्याचा पाऊस यामागे देखील 'टेंपरेचर इडीज'चा महाराष्ट्रावर होत असलेला परिणाम होय. 

७५ वर्षातील रेकॉर्ड ब्रेक पाऊस! 
१९४९ सालापासून हवामान माहिती नोंद घेण्यास दुबईत सुरूवात झाली. ५० अंश तापमानाने भाजून निघणाऱ्या व बुंदबुंद पाण्यासाठी तरसणाऱ्या श्रीमंत वाटवंटी देशांत, गेल्या ७५ वर्षातील उपलब्ध रेकॉर्डनुसार  प्रथमच अशा घटना घडत आहेत, असे डब्ल्यूएएम या सरकारी वृत्तसंस्थेने सांगितले आहे. जगणे मुश्किल करीत या पावसाने महामार्ग आणि घरे तुडुंब भरली आहेत. युएईमध्ये ढगफुटीनंतर बेपत्ता झालेल्या व बुडलेल्या नागरिकांचा शोध घेणे सुरू आहे.

..या ढगफुटीने जागतिक अर्थव्यवस्थेला झटका! 
दुबई ढगफुटीने जागतिक अर्थव्यवस्थेला झटका बसला आहे. भारताकडून अमेरिकेत किंवा अमेरिकेतून भारतात तसेच इतर देशात प्रवास करतांना दुबई हे हवाई जंक्शन म्हणून काम करते. येथूनच शेतमालाची आयात निर्यातही होते. मात्र हवाई वाहतूक ठप्प झाल्याने भारताकडील जवळपास २८ विमानांची उड्डाणे स्थगित झालीत. 

दुबई‌ व इतर आंतरराष्ट्रीय विमानतळावर संपूर्ण वर्षभरात सरासरी ९४.७ मिमी (३.७३ इंच) पाऊस पडतो. मात्र गारपीट होत अचानक १४२ मिलीमीटरच्या पलिकडे कोसळलेल्या पावसाने जगातील सर्वात व्यस्त आणि लांब पल्ल्याच्या अशा संयुक्त अरब अमिरातीच्या वाळवंटात अचानक आलेल्या महापूराने हाहाकार माजवत दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे विस्कळीत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचे एक अत्यंत मुख्य आंतरराष्ट्रीय प्रवासाचे हे केंद्र ठप्प झाल्याने हा जागतिक “महत्त्वपूर्ण व्यत्यय” बुधवारी घोषित झाला आहे.

'बुर्ज खलिफा'वर‌ विजांचा वर्षाव! 
ढगफुटीच्या आपत्तीच्या वेळी, जगातील सर्वात उंच इमारती अशी ओळख असलेले व प्रेक्षणीय स्थळ अशी ख्याती असलेल्या 'बुर्ज खलिफा'च्या मनोऱ्यावर दुबई  आकाशात लखलखाट व गडगडाट करीत आकाशातून विजांचा झालेला वर्षाव हा जगभर चर्चेचा विषय बनतो आहे.

पाकिस्तानही ढगफुटींनी त्रस्त!
संयुक्त अरब अमिरात (यूएई) व ओमानसोबतच पाकिस्तानात देखील ढगफुटीच्या महापुराने (फ्लॅशफ्लड) थैमान घालत जनजीवन ठप्प केले आहे. पाकिस्तानातही गेल्या चार दिवसांपासून ढगफुटी पावसाच्या बळींची संख्या बुधवारी ६३ वर पोहोचली. शेकडो लोक जखमी असून खैबर पख्तुनख्वा व बलुचिस्तान प्रांतात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

एक्स बॅंड डॉप्लर रडार नेटवर्कचा उपाय
'एक्स बॅंड डॉप्लर रडार नेटवर्क' ने ढगफुटी रोखता येत नसली तरी जीवित व वित्तहानी टाळणे व शेतीचे नुकसान अलर्ट देत कमी करणे शक्य आहे. ढगांचा एक्स रे काढत ढगातील पाणी, बाष्प व‌ बर्फ कण यांची बोटाच्या पेरा एवढ्या लहान भागातील ढगांतील पाण्याची इंतभूत माहिती एक्स बॅंड डॉप्लर रडार देते. या माहितीचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), मशील लर्निग (एमएल), पीएलसी व स्काडा आदी आधुनिक तंत्रज्ञानाने विश्लेषण करता येते व देशातील प्रत्येक नागरीकांच्या मोबाईलवर कस्टमाईज स्वरूपात म्हणजे व्यक्तीच्या आवश्यकतेनुसार‌ तसेच घटना घडत असतांना म्हणजे रियल टाईम हवामान‌ अपडेट व‌ अलर्ट पाठविणे शक्य आहे. 

यामुळे अक्षांश, रेखांश असे स्थान निहाय, तसेच किती वाजून किती मिनिटांनी, कितीवेळ, कशा स्वरूपाचा पाऊस पडेल ही माहिती जनहितासाठी देणे जगभर वापरतात त्याच उपलब्ध टेक्नॉलॉजीने भारतात देखील सहज शक्य आहे. महाराष्ट्र सरकारकडे केंद्र सरकारकडून वार्षिक १४ हजार ५०० कोटींपेक्षा जास्त आपत्ती व्यवस्थापन निधी उपलब्ध होतो. कृषि मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना २७ जुलाई २०२१ ला सांगितले होते की, केंद्राने पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जवळपास ७०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. आपत्तीपूर्वी वेगवेगळया बॅंडचे डॉप्लर रडार लावून प्रयोग केले तरी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील  ३५८ तालुक्यांसाठी प्रत्येकी एक असे एक्स बॅंड डॉप्लर रडार बसवित नेटवर्क उभारले तरी होणारा खर्च हा १४,३२० कोटी रूपये जो एकंदर आपत्ती झाल्यानंतर निवारण्यासाठी होणाऱ्या फायदेशीर ठरेल.

अवघ्या ४० कोटी रूपयांत मिळणारे डॉप्लर रडार हे भारतातील इंडियन स्पेस रिसर्च आर्गेनाइजेशन (इस्रो) देखील बनवून जगभर विकते. स्वस्त आणि फक्त १० वर्षे वापरता येणारे महागडे, परदेशी बनावटीचे अथवा चायना मेड डॉप्लर रडारापेक्षा स्वदेशी इस्रो डॉप्लर रडार वापरणे देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनेही फायद्याचेच आहे. भारतात लवकरच राष्ट्रीय एक्स बॅंड डॉप्लर रडार कार्यान्वित होईल.

महाराष्ट्राने कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी ३ हजार ३०० कोटी पेक्षा जास्त खर्च एका वर्षात खर्च केले आहेत. सन २०१८-१९च्या दुष्काळाच्या वेळी हा महागडा प्रयोग करण्यात आला. पण त्याचे निष्कर्ष अजूनही बासनात आहेत. दुसरीकडे  चीनची मदत घेऊन कृत्रिम पावसाचे प्रयोग महाराष्ट्रासह इतर राज्यातही करावेत अशी मागणी वारंवार पुढे येत असते. चीनकडून घेतलेले दहा वर्षांपेक्षा जुने सी बँड रडार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील म्हैसमाळ येथे बसविण्याचा घाट घालणे सुरू आहे. त्याचा  उपयोग कदाचित चक्रीवादळाच्या अंदाजासाठी होईल, पण मराठवाड्यात चक्रीवादळे येतच नाहीत. अशा वेळी जर राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी काही करायचे  असेल, तर शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती मिळण्यासाठी प्रयत्न करायचे असतील, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे व उत्तर महाराष्ट्रात  नाशिक मधील चांडवड येथे एक्स बँड डॉप्लर रडारच उपयोगी ठरणार आहे. ही गोष्ट लवकरच लक्षात घेतली जाईल असा विश्वास आहे.

- प्रा. किरणकुमार जोहरे
संपर्क : 9168981939, 9970368009, 
ईमेल: kirankumarjohare2022@gmail.com

(लेखक भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या पुणे येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटियीरोलाॅजी (आयआयटीएम) चे माजी हवामान शास्त्रज्ञ आहेत, शेतकर्यांसाठी गेल्या १८ वर्षापासून चालवित असलेल्या 'अंदाज नव्हे माहिती!' या विनामोबदला तसेच विनाअनुदानित जनहित राष्ट्रीय हवामान माहिती व अलर्ट सेवेचे प्रणेते आहेत.)

Web Title: dubai flash flood & cloud burst and effect on Indian farming and economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.