Join us

इतका पाऊस असतो का राव ? रोहिणी नक्षत्रा अगोदर सगळीकडे पावसाने पाणीच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 13:12 IST

Pre-Monsoon Rain Maharashtra : सध्या भरवशाच्या पावसाचे नक्षत्र नाही, ना पावसाचे वाहनही नाही. असे असताना ढग जमा झाले की पाऊस कोसळायला सुरुवात होते. एकदा पावसाला सुरुवात झाली की किमान तासभर पाऊस थांबत नाही. त्यामुळे जमिनीत पाणी भरपूर जिरले व मुरले आहे.

कोणतेही पावसाचे नक्षत्र नाही, ना पावसासाठीचे वाहन मात्र मागील १० दिवसांपासून सलग पाऊस पडत आहे. आज रविवारी सकाळी रोहिणी नक्षत्राला सुरुवात होण्याअगोदरच संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील जमीन ओलिचिंब झाली आहे.

मागील १० दिवसांपासून जिल्ह्यातील बदललेले वातावरण पाहता, उन्हाळ्याचा मे महिना सुरू आहे असे कोणी म्हणणार नाही. अगदी सकाळपासूनच पाऊस आज नक्की पडणार, असे वातावरण तयार झालेले असते व हमखास न चुकता पाऊस पडतोही.

सलग १० दिवस पावसाच्या लहान-मोठ्या सरी कोसळत असल्याने जमीन ओलिचिंब झाली आहे. ट्रॅक्टरच्या साहाय्याने केलेल्या नांगरटीतूनही खळखळा पाणी वाहू लागले आहे. आता जिल्ह्याच्या बहुतेक भागांतील जमिनीत पाणी जिरण्यापेक्षा वाहताना दिसत आहे.

सध्या भरवशाच्या पावसाचे नक्षत्र नाही, ना पावसाचे वाहनही नाही. असे असताना ढग जमा झाले की पाऊस कोसळायला सुरुवात होते. एकदा पावसाला सुरुवात झाली की किमान तासभर पाऊस थांबत नाही. त्यामुळे जमिनीत पाणी भरपूर जिरले व मुरले आहे.

आता ओढे-नाले वाहते झाले आहेत. रविवारी (दि. २५) सकाळी ९ वा. ३१ मिनिटांनी रोहिणी नक्षत्राला सुरुवात होणार आहे. म्हणजे पावसाच्या नक्षत्राला उद्या सकाळी सुरुवात होत असताना अगोदरच उघडी-बोडकी माळरानाला हिरवाई तयार होत आहे.

९१ पैकी १७ मंडळांत १०० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस

• मे महिन्याचा उत्तर तालुक्याचा पाऊस सरासरी १९ मिमी असताना उत्तर तालुक्यात उत्तर तालुक्यात १९० मिमी, तर मार्डी मंडळात २९० मिमी पाऊस पडला आहे. हा पाऊस जिल्ह्यातील २१ मंडळांत सर्वाधिक आहे. इतका पाऊस मे महिन्यात प्रथमच पडला असावा. महिसगाव २२० मिमी, टेंभुर्णी सोलापूर मंडळात २१७ मिमी, उपळे दुमाला २२४ मिमी, टेंभुर्णी, कुडूवाडी २०८ मिमी, महूद व अकलूज मंडळात प्रत्येकी २०३ मिमी पाऊस पडला आहे.

• दोनशे मिमी दरम्यान चार मंडळांत पाऊस पडला आहे. विंचूर (दक्षिण सोलापूर) मंडळात सर्वांत कमी ६८ मिमी पाऊस तिर्हे मंडळात, विंचूर मंडळात ७१ मिमी, पानगाव, नारी व तडवळ मंडळात प्रत्येकी ७५ मिमी पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील २१ पैकी १७ मंडळांत १०० मिमी पेक्षा कमी पाऊस पडला आहे.

इतका पाऊस असतो का राव ?

• १३ व १५ रोजी जोरदार पाऊस पडला. त्यानंतर कमी-अधिक प्रमाणात पडलेला पाऊस १४५.६ मिमी इतका झाला आहे. जिल्ह्यात एकूण १४५.६ मिमी, तर उत्तर तालुक्यात सर्वाधिक १९० मिमी पाऊस पडला आहे.

• माळशिरस तालुक्यात १८० मिमी, माढा तालुक्यात १६९ मिमी, करमाळा तालुक्यात १५७ मिमी, सांगोला, मोहोळ तालुक्यात १३९ मिमी, मंगळवेढा तालुक्यात १३८ मिमी, दक्षिण तालुक्यात १३६ मिमी, बार्शी तालुक्यात १२८ मिमी, अक्कलकोट ११५ मिमी, पंढरपूर तालुक्यात १११ मिमी, याप्रमाणे शुक्रवारी रात्रीपर्यंत पाऊस पडला आहे. शनिवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या.

हेही वाचा : उजनीचा पाणीसाठा वाढला; धरण क्षेत्रात गेल्या आठ दिवसांत १३७ मि.मी. पावसाची नोंद

टॅग्स :पाऊसशेती क्षेत्रसोलापूरहवामान अंदाजमोसमी पाऊसशेतकरी