Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही समुद्रात तयार झाली चक्रीय स्थिती; राज्यात या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 09:16 IST

Maharashtra Monsoon Update अरबी समुद्रातील गुजरात किनारपट्टीवर तसेच बंगालच्या उपसागरातही निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीमुळे मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे तब्बल २१ दिवसांनंतर मान्सूनने आगेकूच केली आहे.

पुणे : अरबी समुद्रातील गुजरात किनारपट्टीवर तसेच बंगालच्या उपसागरातही निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीमुळे मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे तब्बल २१ दिवसांनंतर मान्सूनने आगेकूच केली आहे.

सध्या मान्सूनने राज्याचा अमरावती व नागपूर जिल्ह्याचा काही भाग वगळता ९५ टक्क्यांहून अधिक भूभाग व्यापला आहे. पुढील दोन दिवसांत मान्सून संपूर्ण राज्यात पसरणार आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते पाच दिवस राज्यात मान्सून सक्रिय राहणार आहे. कोकणात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

राज्यात मान्सूनने २५ मे रोजी धडक दिली. त्यानंतरच्या २४ तासांतच मुंबई, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार हजेरी लावली. मात्र, त्यानंतर प्रगतीसाठी आवश्यक असणारी स्थिती निवळल्याने मान्सून गेले २१ दिवस याच भागात रेंगाळला होता.

अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातही मान्सूनच्या वाऱ्यांसाठी अनुकूल स्थिती नसल्याने पावसाने उघडीप दिल्याचे चित्र राज्यात निर्माण झाले होते.

भारतीय समाजशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप म्हणाले, गुजरात किनारपट्टीवरील अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांची तीव्रता वाढली असून पश्चिमेकडील वारे राज्यात आर्द्रता घेऊन येत आहेत.

परिणामी मान्सून सक्रिय झाला आहे. यामुळे मान्सून सध्या संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र, गुजरातचा काही भाग, नैऋत्य मध्यप्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा आणि उपहिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीमपर्यंत पुढे सरकला आहे.

कुठे कुठला अलर्ट?दोन्ही समुद्रात तयार झालेल्या स्थितीमुळे पुढील तीन दिवसांत कोकणात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता असून या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर त्यानंतरच्या दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसांत बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात पावसाची तीव्रता मात्र कमी राहणार असून मान्सून मात्र सक्रिय राहणार आहे.

मान्सूनचा सध्याचा मुक्काममान्सूनची उत्तर सीमा सध्या वेरावल, भावनगर, वडोदरा, खरगोन, अमरावती, दुर्ग, बारगड, चांदबली, सँडहेड बेट, बालुरघाट या भागातून जाते. गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये, विदर्भाच्या उर्वरित भागांत तसेच छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागांमध्ये नैऋत्य मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे; पुढील २४ तासांत उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमचे उर्वरित भाग आणि २ दिवसांत पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशचे काही भाग व्यापेल.

अधिक वाचा: बनावट दस्त व कुलमुखत्यारपत्र नोंदणी कायदा बदलणार; काय होणार बदल? वाचा सविस्तर

टॅग्स :मोसमी पाऊसहवामान अंदाजपाऊसमोसमी पावसाचा अंदाजमुंबईकोकणविदर्भ