उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे अवघ्या महाराष्ट्राला अक्षरशः हुडहुडी भरली आहे. शनिवारी राज्यात सर्वांत कमी तापमान जळगाव येथे ६ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले, तर मुंबईत १४.६ अंश सेल्सिअस हा या हंगामातील आतापर्यंतचा नीचांकी पारा नोंदवण्यात आला.
मध्य महाराष्ट्रातील किमान तापमान बऱ्यापैकी घसरले आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासोबतच विदर्भातही थंडीचा कडाका आहे, तर मुंबई महानगरात बदलापूरसह नवी मुंबईतही शनिवारी गारठा होता.
दरम्यान राज्यभर मंगळवारपर्यंत पारा घसरलेलाच राहील. तर रविवारी किमान तापमान आणखी खाली येईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये...
नांदेड १०.१, परभणी १०.८, धाराशिव ११, वाशिम ११, बुलढाणा ११.५, चंद्रपूर ११.६, सांगली ११.९, सोलापूर १२.३, महाबळेश्वर १२.६, नंदुरबार १२.८, कोल्हापूर १४.१, मुंबई १४.६, माथेरान १७.२, अमरावती १०.५, छ. संभाजीनगर १०.८, गडचिरोली १०, अकोला १०.१, सातारा ९.४, वर्धा ९.६, नागपूर ८.६, यवतमाळ ९, मालेगाव ७.८, गोंदिया ८.२, नाशिक ६.९, जेऊर ७.५, जळगाव ६, अहिल्यानगर ६.४.
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात एक अंकी किमान तापमानाची नोंद होत आहे. पुढील चार ते पाच दिवस थंडीचा जोर कायम राहील. - कृष्णानंद होसाळीकर, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ.
हेही वाचा : आता सर्पदंशावर होणार अचूक उपचार; स्नेक वेनम किटमुळे कळणार सर्पदंश विषारी की बिनविषारी
